पणजी - वेबसीरिज मोठ्या प्रमाणात बघितल्या जात आहेत. त्यामधील कटेंट हा बहुधा बोल्ड असतो. युवापिढी मोठ्या प्रमाणात वेब सीरिज पाहत असल्यामुळे त्यांच्या मानसिकतेचा विचार करून सेन्सॉर प्रमाणपत्र बंधनकारक करणे गरजेचे आहे, असे मत अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले.
उसगावकर 'बँडकार' या हॅरी फर्नांडिस दिग्दर्शित कोकणी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्याचा पणजीत एका विशेष कार्यक्रमात टीझर रिलीज करण्यात आला. त्यावेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या.
हेही वाचा - 'बेईंग स्ट्राँग' म्हणत सलमान खानने दिले फिटनेसचे धडे
वेबसीरिजमध्ये काम करणार आहात का? आणि वेब सीरिजसाठी सेन्सॉर प्रमाणपत्र गरजेचे आहे का? असे विचारले असता उसगावकर म्हणाल्या, अजून वेब सीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळालेली नाही. काही प्रस्ताव येतात, बोलणी होतात पण पुढे जात नाही. अजून तशी संधी मिळालेली नाही. तसेच वेब सीरिज पाहिलेली नाही. मात्र, वेब सीरिज युवक मोठ्या प्रमाणात पाहत असतात. याचा कंटेंट बोल्ड असतो असे ऐकले आहे. त्यामुळे यासाठी सेन्सॉरची गरज आहे. 18 वर्षांनंतरच्या पिढीचे ठीक आहे. परंतु, 14 ते 15 वर्षांची मुले वेब सीरिज पाहतात. त्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होत असतो. त्यामुळे तर चित्रपटांसाठी 'अ' प्रमाणपत्राची आवश्यकता भासली. मुलांना आपण प्रौढ झालो असे वाटत असले तरीही त्यांच्या मानसिकतेचा विचार करून वेब सीरीजसाठी सेन्सॉरची गरज आहे.
कोकणी चित्रपटाकडे वळण्याचे काही विशेष कारण आहे का? असे विचारले असता उसगावकर म्हणाल्या, कोकणी ही माझी मातृभाषा असल्याने आपल्या भाषेतून काम करण्याची इच्छा होती. एक ग्लॅमरस अभिनेत्रीच्या प्रतिमेला छेद देत मी आता कोकणाकडे वळली आहे. जरी हे आव्हानात्मक असले तरीही मला आव्हाने स्वीकारायला आवडते. जेव्हा 30 वर्षांपूर्वी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला तेव्हा कोकणीमध्ये एखादा दुसरा चित्रपट बनत होता. आज कोकणी चित्रपट मूळ दरात असून अनेक महोत्सवात वर्णी लागत आहे. जसा मराठी चित्रपट हिंदीच्या खांद्याला खांदा लावत आहे. तसा कोकणी चित्रपटही आहे. मात्र, त्याला अजून बजेट आणि मार्केटिंगची गरज आहे. अशावेळी हॅरी फर्नांडिस यांनी 'जावई नंबर 1' च्या माध्यमातून कोकणीत पदार्पणाची संधी दिली. आता पुन्हा 'बँडकार' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
हेही वाचा - 'दंगल गर्ल' सान्या मल्होत्राची आणखी एका चित्रपटात वर्णी, शूटिंग सुरू
आपल्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेत उसगावकर म्हणाल्या, मराठी हिंदीच्या जोडीने प्रादेशिक भाषा आणि इंग्रजी चित्रपटांमध्येही काम केले आहे. प्रादेशिक चित्रपट बनवा, असे प्रत्येक प्रदेशातील लोकांना वाटत आहे. कलाकारासाठी भाषेचा प्रश्न महत्त्वाचा नसतो तर कला हीच महत्त्वाची असते, असे उसगावकर यांनी सांगितले.