अनेक बालकलाकार मोठेपणी प्रमुख भूमिकेसाठी चांगल्या चित्रपटाच्या शोधात असतात. हिंदी मालिका ‘नोंकझोक’ मधून बालकलाकार म्हणून काम केलेली विशाखा कशाळकर मराठी चित्रपट ‘व्हिसल ब्लोईंग सूट’मधून प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून तिचा अनोखा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नाटकं तसेच हिंदी टीव्ही मालिकांमधील ओळखीचा एक चेहरा आता मराठी चित्रपटात पहिल्यांदाच काम करताना दिसणार आहे. वेगळ्या धाटणीची भूमिका करायला मिळाल्याचं समाधान व्यक्त करताना ही भूमिका हा चित्रपट प्रेक्षकांसाठी सुद्धा खूप वेगळा अनुभव असेल असा विश्वास विशाखाने व्यक्त केला.
‘व्हिसल ब्लोईंग सूट’ चित्रपटात दृकश्राव्य माध्यमाचा सशक्त वापर केला गेलेला असून, भारावून टाकणारे संगीत, कथेचा छाती दडपविणारा आवाका, वैज्ञानिक कसोटीवर खरी उतरणारी अनेक वर्ष रिसर्च करून लिहिलेली संहिता ही या चित्रपटाची खास वैशिष्ट्ये असणार आहेत. मालिका, नाटकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री विशाखा कशाळकर ‘व्हिसल ब्लोईंग सूट’ या चित्रपटातील आव्हानात्मक भूमिकेतून मराठी चित्रपटात पदार्पण करीत आहे.‘नोंकझोक’, ‘संभव क्या’ या हिंदी तसेच ‘एक वाडा झपाटलेला’, ‘निवडुंग’ या मराठी मालिकांमधून विशाखाने अभिनय केला आहे. ‘राधा’ या मराठी एकपात्री नाटकामध्ये पाच वेगवेगळ्या भूमिका सशक्तपणे पेलत आपल्या अभिनयाची चुणूक विशाखाने दाखविली होती. आता ‘व्हिसल ब्लोईंग सूट’ या चित्रपटातही तिच्या अभिनयाचे वेगळे रंग दिसणार आहेत.
अभिनेत्री विशाखा कशाळकर चा मराठीतील पदर्पणीय सिनेमा ‘व्हिसल ब्लोईंग सूट’ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये भाग घेणार असून तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीलाही येणार आहे.
हेही वाचा - 'स्पायडर मॅन 3'चे अधिकृत नाव असेल ‘स्पायडर मॅनः नो वे होम’