मुंबई - अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण आणि चित्रकर्मी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, लीला गांधी आणि सुषमा शिरोमणी यांना चित्रभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुंबईत विशेष पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती देण्यात आली.
मागील ३ वर्षांपासून रखडलेल्या या पुरस्कार सोहळ्यासाठी अखेर महामंडळाला मुहूर्त सापडला आहे. त्यानुसार, या ३ वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी ६ कलाकारांना एकत्रितपणे या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. १९ ऑगस्ट रोजी मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात हा सोहळा पार पडणार आहे.
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांच्यासोबतच ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, ज्येष्ठ कला दिग्दर्शक श्रीकांत घोंगडे, ज्येष्ठ चित्रपट निर्माते किशोर मिस्किन, ज्येष्ठ अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शक सुषमा शिरोमणी यांची निवड चित्रभूषण पुरस्कारासाठी करण्यात आली. मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि ५१ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
हे आहेत चित्रकर्मी पुरस्काराचे मानकरी -
चित्रकर्मी पुरस्कारासाठी १५ चित्रकर्मींची निवड करण्यात आली आहे. यात दिग्दर्शक रमेश साळगावकर, संकलक संजीव नाईक, अभिनेते विलास उजवणे, संगीत संयोजक अप्पा वढावकर, नृत्य दिग्दर्शक नरेंद्र पंडित, ध्वनी आरेखन करणारे प्रशांत पाताडे, अभिनेते सतीश पुळेकर, अभिनेत्री निर्माती प्रेमा किरण, अभिनेत्री सविता मालपेकर, अभिनेते चेतन दळवी, संगीतकार अच्युत ठाकूर, अभिनेते आणि निर्मिती प्रबंधक वसंत इंगळे यांचा समावेश आहे. मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि ११ हजार रुपये रोख, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यंदा या पुरस्कार सोहळ्यात सेलिब्रिटी कलाकाराऐवजी बरीच वर्षे मराठी सिनेसृष्टीत काम केलेल्या कलाकार, कोरिओग्राफर यांना आपली कला सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या कलाकारांनी त्यासाठी कोणतंही मानधन न घेता सादरीकरण करण्यास होकार दिला आहे.
पत्रकार परिषदेत चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, संचालिका अभिनेत्री वर्षा उजगावकर, संचालिका चैत्राली डोंगरे, कार्यवाह अभिनेता सुशांत शेलार हे उपस्थित होते.