मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच 'मास्क मॅन' अशा नावाची व्यक्तिरेखा एखाद्या चित्रपटात साकारली जात आहे. 'विक्की वेलिंगकर' या आगामी चित्रपटामध्ये 'मास्क मॅन'ची प्रमुख व्यक्तीरेखा साकारण्यात येणार आहे. त्यामुळे हा मास्क मॅन नेमका कोण आहे, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या चित्रपटातील 'मास्क मॅन' तर समोर आला आहे. मात्र, या मुखवट्यामागे कोणाचा चेहरा दडलेला आहे, याची उत्कंठा कायम आहे.
'विकी वेलींगकर' हा एक थ्रिलर मराठी चित्रपट असणार आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात सस्पेन्स पाहायला मिळणार आहे. त्यामुळेच अद्याप या मुखवट्यामागील चेहरा समोर आलेला नाही. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची यामध्ये मुख्य भूमिका राहणार आहे.
हेही वाचा -'भूल भुलैय्या -२' चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात
मंगळवारी (८ ऑक्टोंबर) या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शिक करण्यात आलं आहे. या पोस्टरवरून ही व्यक्तिरेखा खलनायकी असल्याचे लक्षात येते. या पोस्टरवरील चेहरा नेमका कोणाचा आहे, याबाबत अनेक कयास लावले जात आहेत. मात्र, अद्याप त्याबद्दल कोणीही ठामपणे सांगू शकलेले नाही.
'विक्की वेलींगकर'चं दिग्दर्शन सौरभ वर्मा हे करत आहेत. त्यांनी यापूर्वी 'मिकी व्हायरस', '७ अवर्स टू गो' आणि इतर अनेक गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तर, 'जीसिम्सटचे अर्जुन सिंग बरान, कार्तिक डी निशाणदार, अनुया चौहान कुडेचा, रितेश कुडेचा, सचिन लोखंडे आणि अतुल तारकर यांची निर्मिती आहे.
'मराठी चित्रपटांमध्ये अशा प्रकारचे ‘मास्क मॅन’ कॅरेक्टर कधीच साकारले गेले नव्हते. या चित्रपटाची कथा एका तरुणीवर बेतलेली असून ही तरुणी कॉमिक पुस्तक कलाकार आहे ती घड्याळे विकते. आजच्या डिजिटल अनागोंदीच्या काळात ती विक्री करीत असलेल्या वस्तूंना तसे काहीच महत्त्व नाही', असे दिग्दर्शक सौरभ वर्मा यांनी म्हटले.
हेही वाचा -बिहारच्या पूरग्रस्तांना अमिताभ यांनी केली ५१ लाखाची मदत
चित्रपटाच्या पोस्टरची टॅगलाईनसुद्धा ‘मुखवट्यामागे चेहरा लपतो, रावण नाही’ अशाच आशयाची आहे. त्यामुळे हा चित्रपट नेमका कसा असेल, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल, असेही सौरभ वर्मा म्हणाले.
या चित्रपटाच्या कथेमध्ये अनेक धक्के आणि वळणे आहेत. ‘मास्क मॅन’ हा केवळ एक ट्रेलर आहे. ज्याप्रमाणे रामाचा रावणावरील विजय हा अनेकांना प्रेरणादायी आणि नवी उमेद देणारा ठरतो त्याप्रमाणे ‘विक्की वेलिंगकर’ या चित्रपटाचा शेवट आनंदायी होतो का, हे पाहणे औत्सुक्याचे असेल. ६ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
हेही वाचा -पाहा, 'करण अर्जुन'मधील 'भांगडा पाले' या गाण्याचे रिक्रिएशन