मुंबई - सरत्या वर्षाला निरोप देऊन बॉलिवूडकरांनी नव्या वर्षाकडे नव्या जोमाने वाटचाल सुरू केली आहे. मागच्या वर्षापेक्षा काही वेगळं घेऊन येण्याचा प्रयत्न २०२० मध्ये दिसणार आहे. या वर्षात काय नवीन गोष्टी असतील, पाहुयात याची एक झलक...
- अक्षय कुमार
अक्षय कुमारसाठी २०१९ हे वर्ष अतिशय रोमांचकारी ठरलं आहे. सलग एकापाठोएक त्याच्या ४ चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं आहे. यावर्षी देखील दोन मोठ्या उत्सवांच्यावेळी त्याचे चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज होतील. प्रेक्षकांची 'ईद' आणि 'दिवाळी' धमाकेदार करण्यासाठी तो 'सूर्यवंशी' आणि 'लक्ष्मी बाँब' हे चित्रपट घेऊन येणार आहे. तर, या वर्षात त्याचे 'बच्चन पांडे' आणि 'पृथ्वीराज' हे चित्रपटही प्रदर्शित होतील.
- आयुष्मान खुराना
आयुष्मानचे एकापाठोएक एक तब्बल सात चित्रपट हिट झाले आहेत. त्यामुळे बरेच दिग्दर्शक आणि निर्माते त्याला आपल्या चित्रपटामध्ये घेण्यासाठी उत्सुक आहेत. २०२० मध्ये त्याचा 'शुभ मंगल ज्यादा सावधान', 'गुलाबो सिताबो' हे चित्रपट प्रदर्शित होतील.
- महिलाप्रधान चित्रपट
या वर्षात महिलाप्रधान चित्रपटांचीही वर्दळ बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळणार आहे. यामध्ये दीपिका पदुकोणचा 'छपाक', तापसी पन्नुचा 'थप्पड', कंगना रनौतचा 'धाकड', 'पंगा', 'थलायवी', क्रिती सेनॉनचा 'मिमी', कियारा आडवाणीचा 'इंदू की जवानी' या चित्रपटांचा समावेश आहे.
- रणवीर सिंग
रणवीर सिंग यावर्षी '८३' हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट १९८३ साली झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपवर आधारित आहे. तो यामध्ये कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. कबिर खान यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. १० एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
- रणबीर - आलिया
बॉलिवूडमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या नात्याची चर्चा नेहमीच रंगताना पाहायला मिळते. मात्र, २०२० मध्ये पहिल्यांदा ते एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. 'ब्रम्हास्त्र' चित्रपटात त्यांची मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे.
- सेलिब्रिटी वेडिंग
या वर्षात काही कलाकार लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे. यामध्ये वरुण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल हे लग्न करणार असल्याची चर्चा आहे. रणबीर आणि आलिया हे देखील या वर्षात लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे. तर, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्याही लग्नाचे वारे बॉलिवूडमध्ये वाहत आहेत. फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्याही लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. तर, नेहा पेंडसे आणि शार्दुल हे दोघेही लग्नगाठ बांधणार असल्याचे बोलले जात आहे.
- इरफान खानचे पुनरागमन
अभिनेता इरफान खान मागच्या वर्षी कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी न्यूयॉर्क येथे भरती झाला होता. कॅन्सरवर यशस्वी मात करून तो भारतात परतला आहे. पडद्यावरही तो पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'अग्रेजी मीडियम' या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसेल. यामध्ये त्याच्यासोबत करिना कपूरदेखील दिसणार आहे.
- अल्प बजेट चित्रपट
मागच्या वर्षी काही अल्प बजेट चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. यामध्ये आयुषअमान खुरानाचा 'ड्रीमगर्ल', 'बाला' या चित्रपटांचा समावेश होता. यावर्षीदेखील काही अल्प बजेट चित्रपट प्रदर्शित होतील. कथा जर चांगली असेल, तर, अल्प बजेट चित्रपटही हिट होऊ शकतात, हे मागच्या वर्षात पाहायला मिळाले. त्यामुळे यंदाही अल्प बजेट चित्रपट काय कमाल दाखवतात, हे पाहणं महत्वाचं ठरेल.
- नव्या कलाकारांचं बॉलिवूड पदार्पण
या वर्षात काही नवे चेहरे पडद्यावर झळकणार आहेत. यामध्ये माजी 'मिस वर्ल्ड' मानुषी छिल्लर ही अक्षय कुमारसोबत 'पृथ्वीराज' चित्रपटातून पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.
दाक्षिणात्य अभिनेत्री शालिनी पांडे ही रणवीर सिंगसोबत 'जयेशभाई जोरदार' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तिने 'अर्जून रेड्डी' चित्रपटात साकारलेली प्रितीची भूमिका खूप गाजली होती.
राष्ट्रीय पुरस्कार विजेती किर्ती सुरेश देखील अजय देवगनसोबत 'मैदान' चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करत आहे.
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री क्रिस्टल डिसूजाची मोठ्या पडद्यावर वर्णी लागली आहे. इमरान हाश्मी आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती 'चेहरे' चित्रपटात दिसणार आहे.
यांसोबतच काही स्टारकीड्सही यंदा बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत आहेत. यामध्ये सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी, चंकी पांडेचा मुलगा अहान पांडे, पुजा बेदीची मुलगी आलिया बेदी, कॅटरिना कैफची बहिण इझाबेला कैफ हे देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
- बॉलिवूडमध्ये थ्रीडीची क्रेझ
बॉलिवूडमध्ये नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला आहे. यामध्ये व्हीएफक्स, अद्ययावत ग्राफिक्सचा वापर यांसोबतच यंदा थ्रीडीची क्रेझही पाहता येणार आहे. 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी', 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर', हे दोन चित्रपट थ्रीडी मध्ये पाहता येणार आहेत.