मुंबई - संगीत रंगभूमीवरचे अतिशय नावाजलेले व्यक्तिमत्व म्हणजे पंडित वसंतराव देशपांडे यांचा बायोपिक ( Vasantrao Deshpande Biopic ) ‘मी वसंतराव’ ( Mee Vasantrao ) ) दिड-दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित होण्याच्या तयारीत होता. परंतु कोरोना महामारीच्या आघातानं इतर चित्रपटांबरोबरच त्याचीही प्रदर्शन तारीख बेमुदत पुढे ढकलावी लागली होती. आता कोविड परिस्थिती आटोक्यात असल्यामुळे चित्रपट थिएटर्समध्ये प्रदर्शित होऊ लागले आहेत आणि ‘मी वसंतराव’ ( Mee Vasantrao ) सुद्धा आता प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. “माझं गाणं हे माझंच प्रतिबिंब होतं, आहे,” असे म्हणणारे पंडित वसंतराव देशपांडे होते. अशा या दिग्गज, हरहुन्नरी, प्रतिभाशाली शास्त्रीय गायकाचा प्रवास 'मी वसंतराव' या चित्रपटाच्या माध्यमातून उलगडणार आहे.
जगप्रसिद्ध तबलावादक पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन ( Ustad Zakir Hussain ) यांच्या हस्ते या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्यासमोर सादर झाली आहे. उस्ताद झाकीर हुसेन यांनी या चित्रपटाचा पहिला टिझर आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. माझं घराणं माझ्यापासूनच सुरु होईल, असे ठामपणे सांगणाऱ्या पंडीत वसंतराव आणि त्यांच्या संगीताचा वैभवशाली वारसा लाभलेले त्यांचे नातू राहुल देशपांडे हे वसंतरावांची भूमिका साकारत असून त्यांच्या गायकीची एक परंपरा या टीझरच्या माध्यमातून सादर होत आहे.
पं. वसंतराव देशपांडे यांच्यासोबत असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याविषयी उस्ताद झाकीर हुसेन म्हणतात, ''पं वसंतराव देशपांडे हे कलाक्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्व आहे. मुळात त्यांच्यात आणि माझ्यात भावनिक ऋणानुबंध आहेत. साधारण साडे तीन वर्षांचा असल्यापासून मी त्यांना पाहात आलो आहे. वयाच्या आठव्या वर्षी, त्यांच्याच सांगण्यानुसार मी त्यांना एका कार्यक्रमात तबल्याची साथ दिली होती. मी नशिबवान आहे की, इतक्या महान व्यक्तिमत्वाच्या सान्निध्यात मला राहता आले. त्यांची शेवटची मैफिलही माझ्यासोबतच होती. आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या गायकीच्या माध्यमातून त्यांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. मी राहुलजींचा खूप आभारी आहे, त्यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून वसंतरावांना अजरामर केले आहे.”
चित्रपटाचा दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी म्हणाला, ''कोणत्याही चित्रपटाची प्रक्रिया ही सोपी नसते. पहिल्यांदाच मी पिरियड फिल्म करत आहे आणि हे सगळे उभे करण्यासाठी माझ्यासोबत एक चांगली टीम होती, त्यामुळेच हे साध्य होऊ शकले. प्रेक्षकांनी पं. वसंतराव यांचा जीवनप्रवास चित्रपटगृहात जाऊनच अनुभवावा.''
पं. वसंतराव देशपांडे यांचे नातू, संगीत दिग्दर्शक, गायक, अभिनेता राहुल देशपांडे चित्रपटाविषयी म्हणाले की, ''मी आणि निपुणने एकत्र पाहिलेले हे स्वप्न आता साकार होत आहे. मी स्वतःला नशीबवान समजतो की, आजोबांचीच व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला मिळाली आहे. आजोबांच्या सहवासात मी जास्त आलो नाही परंतु त्यांच्याविषयीचे अनेक किस्से मी घरात नेहमीच ऐकले आहेत. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील चढ-उतार मला या चित्रपटाच्या निमित्ताने मला जवळून पाहता आले. ते क्षण मी जगलो आणि त्यातूनच मी मनुष्य, कलाकार आणि गायक म्हणून समृद्ध होऊ शकलोय. नऊ वर्षांचा हा प्रवास अखेर आता पूर्णत्वास येत आहे.''
या चित्रपटाच्या निमित्ताने जिओ स्टुडिओज प्रथमच पदार्पण करत आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चंद्रशेखर गोखले, दर्शन देसाई, निरंजन किर्लोस्कर निर्मित या चित्रपटात राहुल देशपांडे यांनी स्वतः पंडित वसंतराव देशपांडे यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. आणि महत्वाचं म्हणजे या चित्रपटाला संगीतही राहुल देशपांडे यांचेच लाभले आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटात अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर, कौमुदी वालोकर आणि अमेय वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहे.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, संगीताची ही सुरेल मैफल गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच १ एप्रिल २०२२ पासून चित्रपटगृहात रंगणार आहे.
हेही वाचा - शाहरुखच्या राजकुमार हिराणीसोबतच्या चित्रपटाचे असे असेल नियोजन..!