मराठी चित्रपट त्यांच्या आशयघनतेसाठी ओळखले जातात आणि ती ओळख मिळवून देण्यापाठी लेखिका, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे खूप मोठे योगदान होते. प्रायोगिक चित्रपटांचा कणा म्हणून प्रसिद्ध असलेल्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे पडद्याआड गेल्या आहेत. सतत सामाजिक प्रश्नांवर अभ्यासपूर्ण चित्रपट बनविण्यात त्यांचा हातखंडा होता. सुमित्रा भावे यांचे वयाच्या ७८व्या वर्षी सोमवारी सकाळी पुण्यात खासगी रुग्णालयात निधन झाले. पठडीबाहेरची वाट चोखाळणाऱ्या एका प्रतिभावंत दिग्दर्शिकेला गमावल्याची भावना सिनेसृष्टीत व्यक्त होत आहे.
सुमित्रा भावे या मराठी चित्रपट दिग्दर्शिका, निर्मात्या आणि पटकथालेखिका म्हणून आशयघन चित्रपटांची जुळलेल्या होत्या. आकाशवाणीवर त्या वृत्तनिवेदिका होत्या. त्यांनी एकूण सुमारे १४ चित्रपट, ५०हून अधिक लघुपट आणि चार दूरचित्रवाहिनी मालिका केल्या आणि या सर्व मालिकांचे लिखाण भावेंचे आहे. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय सन्मानसुद्धा मिळाले आहेत. भावे यांच्या अनेक समाजकल्याणविषयक शोधपत्रिका प्रकाशित झाल्या आहेत. सोनाली कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, सचिन कुंडलकर अशा अनेक कलाकारांना सुमित्रा भावे यांच्याकडे सिनेमाचे धडे गिरवता आले.
सुमित्रा भावे या ‘डबल एम ए’ असून त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजतून पुणे विद्यापीठातून राज्यशासन आणि समाजशास्त्र या विषयात दोन वेळा एम.ए. केले. त्यांच्याकडे ग्रामकल्याण विषयाची पदविका होती आणि त्यांनी अनेक समाजसेवी संस्थांमध्ये विनामोबदला काम केले. पुण्याच्या कर्वे विद्यापीठाच्या समाजसेवा संस्थेत दहा वर्षे प्राध्यापक आणि त्यानंतर सरकारप्रणीत कम्यूनिटी एड अँड स्पॉन्सरशिपच्या त्या कार्यक्रम व्यवस्थापिका होत्या.
सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांच्यासह त्यांच्या ‘विचित्र निर्मिती’ च्या बॅनरखाली अनेक उत्तमोत्तम मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आणि निर्मितीसुद्धा. अस्तु, एक कप च्या, कासव, घो मला असला हवा, जिंदगी जिंदाबाद (हिंदी), दहावी फ, देवराई, दोघी, नितळ, संहिता सारख्या अनेक संवेदनशील चित्रपट त्यांनी बनविले. त्यांचे चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत नावाजले गेले तर अनेक चित्रपटांना राज्य व राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. त्यांची निर्मिती असलेला आणि सुनील सुकथनकरसोबत दिग्दर्शित केलेल्या ‘कासव’ ला ६४व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कुष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 'दिठी' हा त्यांनी दिग्दर्शित केलेला अखेरचा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही.
दिठी, दहावी फ, अस्तु, एक कप च्या, कासव, घो मला असला हवा, जिंदगी जिंदाबाद, देवराई, दोघी, नितळ या चित्रपटांच्या दिग्दर्शिका तसेच चित्रपट निर्मात्या, पटकथा लेखिका सुमित्रा भावे यांना संपूर्ण ईटीव्ही भारत मराठीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
हेही वाचा - टायगरसोबत मालदिवमध्ये सुट्टी घालवत असलेल्या दिशा पाटनीचा बोल्ड फोटो