मुंबई - केसरी या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा दिग्दर्शक सुजय डहाके सध्या चर्चेत आहे. त्याने सिनेमाच्या प्रमोशनवेळी म्हटले की, ''कुठलेही चॅनेल घ्या, त्यामधील मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या नायिका या ब्राह्मणेत्तर आहेत. त्या शोधून पाहा. यांना काय जाधव, सोनावणे, टेंभूर्णी, मडके सापडत नाहीत का? मी स्वतः एका मिटींगमध्ये होतो, तेव्हा ते म्हणाले की अहो पण ते...ती लागू बंधूंची अॅड कशी करेल..? या रियॅलिटीमध्ये आहात तुम्ही. याच्या मिटींग अटेंड करतो मी. असं बोललं जातंय बाहेर..सांगाना मला तुम्ही...एक्झरसाईज करून पाहा..." असे म्हणत त्याने विविध वाहिन्यांवरी मालिकेंची नावे घेतली आणि मुख्य नायिका या ब्राह्मणेत्तर नसल्याचा दावा केला.
‘तुझ्यात जीव रंगला’मधील पाठकबाई साकारणारी अक्षया देवधर, ‘माझ्या नवऱ्याची बायको’तील अभिनेत्री अनिता दाते, सायली संजीव, ऋता दुर्गुळे असे दाखले देत सुजय डहाकेने मराठी मालिकांमध्ये ब्राह्मणेत्तर नायिका नसल्याचा दावा केला.
पुढे बोलताना सुजयने म्हटले की, 'मला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाल्याचा इतरांना राग आहे. महाराष्ट्रात वर्षाला पाचशे एकांकिका होतात. त्यातून सातारा-सांगली किंवा कुठल्याही ग्रामीण भागातील एकही मुलगी मिळत नाही का?’ असा सवाल सुजयने विचारला. ‘एका मालिकेत (रंग माझा वेगळा) गोऱ्या अभिनेत्रीला काळी केली, काळ्या रंगाची अभिनेत्री मिळाली नाही का?’
सुजय डाहकेची ही संपूर्ण मुलाखत पाहिली तर तो किती सखोल अभ्यास करून बोलत होता हे लक्षात येईल. परंतु, मुलाखतीच्या अखेरच्या भागात त्याने मालिकेतील ब्राह्मणेत्तर नायिकेंचा विषय काढल्यानंतर चर्चेला वेगळे वळण मिळाले.
सुजय डहाकेच्या या मतांवर मराठी मनोरंजन जगतात एक ब्राह्मण आणि ब्राह्मणेत्तर वाद तयार झालाय. सिने जगतात कलाकार, तंत्रज्ञ आणि सर्व प्रकारची कामे करणारे कलावंत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. काही जण सुजयच्या मताला विरोध करीत आहेत तर काहींनी यावर भाष्य न करण्याची भूमिका घेतली आहे. तर सोशल मीडियामध्ये अनकजण सुजयच्या बाजूने लिहीत आहेत.
अभिनेता सौरभ गोखले यांनी आपल्या फेसबुक पेजवर या भूमिकेला विरोध करणारी पोस्ट लिहिली आहे.
अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने फेसबुकवरून सुजयला टोला लगावला आहे. तिने लिहिलंय, ‘मी ब्राह्मण नाही, सीकेपी आहे. माझ्याकडे काम आहे. याला टॅलेंट म्हणुया का?’ असा तिरका सवाल तिने विचारला आहे. मात्र तेजश्रीची ही पोस्ट तिच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून नाही.
या मुलाखतीच्यावेळी केसरी सिनेमाची टीम हजर होती. त्यामध्ये अभिनेता जयवंत वाडकरही उपस्थित होते. ही मुलाखत केसरीच्या प्रमोशनच्यावेळी १५ दिवसांपूर्वी पार पडली. मात्र, सोयीने तो आता प्रसिध्द का करण्यात आला यावर जयंत वाडकर यांनी आश्चर्य व्यक्त केलंय.