मुंबई - मराठी अभिनेता सुबोध भावे याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. सुबोधची महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती सांस्कृतिक खात्यातर्फे वर्षभराच्या कालावधीसाठी करण्यात येते. मराठी सिनेमे आणि नाटकं यांच्या प्रश्नांना शासन दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी हे महामंडळ काम करते.
यासाठी राज्यभरातून पाच नावांची नेमणूक झालेली असून यात निर्माते संग्राम गजानन शिर्के. जे स्वतः इम्पा या संस्थेचे सक्रीय सदस्य आहेत, त्यांचीही निवड करण्यात आली आहे. त्यांच्याशिवाय कोल्हापूरमधील अशोक देसाई, सायली रघुनाथ कुलकर्णी आणि अभिनेत्री निशा परूळेकर हिची सुद्धा या महामंडळाच्या संचालक पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे.
संग्राम शिर्के हे कायमच बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या मराठी कलाकारांचा आवाज बनून वावरतात. तर सुबोधने गेल्या काही दिवसात मराठी सिनेसृष्टी आणि नाट्यसृष्टीला भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे. याशिवाय नुकत्याच आलेल्या कोल्हापूर आणि सांगलीमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी त्याने पुढाकार घेऊन, लागेल ती सर्व मदत केली. कलाकारांना एकत्र आणून मदतीची मोट बांधण्यात त्याचा पुढाकार होता. याशिवाय शिवसेना चित्रपट सेनेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी तो समर्थपणे पार पाडतो आहे.
अभिनेत्री निशा परूळेकर गेला काही काळ भाजपमध्ये सक्रीय झाली असून महापालिका निवडणुकीत कांदिवली भागातून तिने निवडणूकही लढवली होती. पक्षाकडून अनेक सामाजिक कामांमध्ये ती पुढाकार घेते. अशात आता तिच्या क्षेत्रासाठी कार्यरत होण्याची संधी तिला यानिमित्ताने मिळालेली आहे.