कोची - भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज श्रीशांत वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतो. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळलेल्या श्रीशांतला बीसीसीआयने दिलासा दिला. बीसीसीआयने श्रीशांतवरची आजीवन बंदी ७ वर्षाने कमी केली. त्यामुळे तो भारतीय संघात परतण्यास फार उत्सुक आहे. पण त्याअगोदर, तो एका हॉररपटात भूमिका साकारणार आहे.
हेही वाचा - अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने वृत्तपत्राविरूद्ध दाखल केला खटला, कारण...
श्रीशांत छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमधुनही चर्चेत आला होता. आता तो दाक्षिणात्य अभिनेत्री हंसिका मोटवानी सोबत एका हॉररपटात भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. या हॉररपटाचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार, हरी शंकर आणि हरीश नारायण या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून रंगनाथन या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.
यापूर्वी, हरी शंकर आणि हरीश नारायण यांनी प्रसिद्ध तामिळ चित्रपट 'अंबुली'चे दिग्दर्शन केले होते. अंबुली हा तामिळ चित्रपटाच्या इतिहासातील पहिला स्टीरियोस्कोपिक थ्री-डी चित्रपट होता. हंसिकाने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले असून तिने बॉलिवूडमध्येही काम केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ती पहिल्यांदाच श्रीशांतसोबत पडद्यावर झळकणार आहे. आता त्यांची या चित्रपटातील केमेस्ट्री कशी असेल, हे पाहणं रंजक ठरेल.