चेन्नई : प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे आज चेन्नईमध्ये निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. आज दुपारी १ वाजून चार मिनिटांनी त्यांचे निधन झाले. त्यांचे पुत्र एस. पी. चरण यांनी याबाबत माहिती दिली.
५ ऑगस्ट रोजी त्यांना चेन्नईच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचेही स्पष्ट झाले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत चालली होती. गुरुवारी रात्रीच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर आज त्यांची कोरोनाशी लढाई अयशस्वी ठरली.
हेही वाचा : एस. पी. बालसुब्रमण्यम: सलमान खान ते कमल हसनच्या गाण्यांमागील जादुई आवाज
एस. पी. यांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातमीने देशभरातील चाहत्यांना धक्का बसला होता. २० ऑगस्टला त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी सायंकाळी सहा वाजता कित्येक लोकांनी आणि सेलिब्रिटींनी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी एकत्र प्रार्थना केली होती.
बालसुब्रमण्यम यांनी तेलुगु, तमिळ, कन्नड, हिंदी आणि मल्याळम अशा सर्व भाषांमध्ये हजारो लोकप्रिय गाणी गायली आहेत.
एसपीबी (ज्या नावाने ते लोकप्रिय होते.) यांचा जन्म 4 जून 1946 ला आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील कोनेटम्मापेटा येथे झाला होता. त्यांचे पूर्ण नाव श्रीपती पंडितराध्युला बालसुब्रह्मण्यम असे होते. गायक एस.पी. शैलजा यांच्यासह त्यांना दोन भाऊ व पाच बहिणी आहेत.
त्यांचे वडील आंध्र प्रदेशातील हरिकथा विद्वान (धार्मिक कथांचे आख्यान करणारे) होते. त्यांनी उपजीविकासाठी गावच्या चौकात धार्मिक लोकगीते गायिली. बालसुब्रमण्यम यांची कलाक्षेत्रातील ही पहिली ओळख होती.
त्यांचे दक्षिण भारतीय पारंपरिक संगीतातील औपचारिक शिक्षण झाले नव्हते. मात्र, त्यांचे कान इतके चांगले होते की कोणत्याही शास्त्रीय प्रशिक्षण नसणे हा त्यांच्यासाठी अडथळा ठरला नव्हता. ते प्रांजळपणे कबूल करत असत की, 'आजही मला अभिजात संगीतातीत 'अ..आ..ई 'सुद्धा माहीत माहित नाही.'
हेही वाचा : प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचा संक्षिप्त परिचय