मुंबई - 'धक धक गर्ल' माधुरी दिक्षितच्या गाण्याची सर्वांनाच क्रेझ आहे. माधुरीच्या नृत्याची मोहिनी बॉलिवूडच्या इतर कलाकारांवरही पाहायला मिळते. आमिर खानच्या 'दंगल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सान्या मल्होत्रानेही माधुरीच्या गाण्यावर डान्स केला आहे. तिचा हा डान्स एवढा मजेदार आहे, की काही तासांमध्येच हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
सान्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती माधुरी दिक्षितचं लोकप्रिय गाणं 'हमको आज कल है इंतजार' या गाण्यावर डान्स करताना दिसते. यामध्ये तिच्या चेहऱ्यावर माधुरीसारखेच हावभाव पाहायला मिळतात.
हेही वाचा -'बिग बीं'पेक्षा मोठी आहे शाहरुखची फॅन फोलोविंग, किंग खानने 'असे' मानले आभार
'बऱ्याच दिवसांपासून मी डान्स केला नव्हता. त्यामुळे मलाही डान्स करण्याची प्रतिक्षा होती', असं कॅप्शन देऊन तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे. सोशल मीडियावरही या व्हिडिओला प्रचंड लाईक्स मिळत आहेत.
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, सान्या काही महिन्यांपूर्वीच अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी सोबत 'फोटोग्राफ' या चित्रपटात झळकली. आता ती विद्या बालनसोबत 'शकुंतला देवी' या बायोपिकमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटातील तिचा लूकही प्रदर्शित झाला आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.