मुंबई - हिंदी चित्रपटांप्रमाणेच आता मराठी चित्रपटांचेही हिंदी रिमेक होण्यास सुरुवात झाली आहे. मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, लेखक प्रवीण तरडे यांनी आजवर बऱ्याच मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांचा २०१८ साली 'मुळशी पॅटर्न' हा चित्रपट हिट झाला होता. या चित्रपटाचा हिंदी रिमेक आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानची महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहे.
'मुळशी पॅटर्न' हा चित्रपट शेतकऱ्यांवर आधारित होता. यामध्ये अभिनेता ओम भूतकरची मुख्य भूमिका होती. आता या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये आयुष शर्माची मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे. या हिंदी रिमेकची घोषणा मागच्याच वर्षी करण्यात आली आहे.
हेही वाचा -'कभी ईद कभी दिवाली'मध्ये भाईजानसोबत 'या' अभिनेत्रीची वर्णी
आयुष शर्मा हा सलमान खानची बहीण अर्पिताचा पती आहे. त्याने वर्षी 'लव्हयात्री' चित्रपटातून आपल्या सिनेकारकीर्दीची सुरुवात केली होती. या चित्रपटात तो रोमॅन्टिक हिरोच्या भूमिकेत दिसला होता. आता 'मुळशी पॅटर्न'मध्ये तो अॅक्शन हिरोच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिराज मिनावाला हे या हिंदी रिमेकचे दिग्दर्शन करणार आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, सलमानला या चित्रपटाची कथा खूप आवडली आहे. या चित्रपटात तो पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. तो या चित्रपटासाठी १५ ते २० दिवस शूटिंग करणार आहे. त्याचा आगामी 'राधे' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले, की तो या चित्रपटाकडे वळणार आहे.
हेही वाचा -..यामुळे बिग बॉसच्या पुढच्या सीझनमध्ये दिसणार नाही सलमान खान ?