मुंबई - ‘सैराट’ चित्रपटातील प्रेमकथा खूपच गाजली होती. त्या चित्रपटाचा पगडा आजही काही चित्रपटांच्या कथानकावर दिसतो. अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरलेल्या या चित्रपटातून मनोरंजनसृष्टीतला एक गुणी अभिनेत्री मिळाली ती म्हणजे रिंकू राजगुरू जिला ‘सैराट’ मधील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्काराने (खास नोंद) सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर ‘कागर’ आणि ‘मेकअप’ हे मराठी चित्रपट तिने केले. तसेच हिंदीत तिने ‘हंड्रेड’ नावाची वेब सिरीज केली ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आता रिंकू राजगुरू एका नवीन ‘आठवा रंग प्रेमाचा’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
प्रेम ही संकल्पनाच चिरंतन राहणारी असल्यानं आतापर्यंत प्रेमावरचे अनेक चित्रपट येऊन गेले आणि या पुढेही येत राहतील. "आठवा रंग प्रेमाचा" हा चित्रपट सात रंगांपलीकडील आठवा प्रेमाचा रंग दाखवणार आहे. त्यामुळे आधुनिक काळातली आणि फ्रेश-मॉडर्न कथा प्रेक्षकांना पाहता येईल. आपल्या सौंदर्यानं आणि अदांनी प्रेक्षकांना मोहवणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू आता प्रेक्षकांना ‘आठवा रंग प्रेमाचा’ दर्शविणार आहे. खुशबू सिन्हा यांचे दिग्दर्शकीय पदार्पण असलेल्या या चित्रपटाचे टायटल सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आले आहे. समीर कर्णिक, राकेश राऊत आणि आशिष भालेराव या चित्रपटाचे निर्माते आहेत.
!['Aathwa Rang Premacha'](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-rinku-rajguru-aathva-rang-premacha-mhc10001_17032021002040_1703f_1615920640_165.jpeg)