मुंबई - जवळपास गेले संपूर्ण वर्ष लॉकडाऊनमध्ये गेले असले तरी या लॉकडाऊनच्या झळा अजूनही अनुभवायला मिळत आहेत. कोरोना महामारीमुळे लादलेल्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण जगाची आर्थिक घडी विस्कटली गेली. कधी नव्हे ते लोकांना घरात कैद करून घेऊन बसावे लागले. याचा आर्थिक, भावनिक, सामाजिक, मानसिक अशा बहुसंख्य पातळ्यांवर परिणाम दिसून आला. या घडामोडींवर चित्रपट बनला नसता तर नवल होते. परंतु ख्यातनाम दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी ‘इंडिया लॉकडाऊन‘ या चित्रपटाची घोषणा केली असून लवकरच याचे चित्रीकरण सुरू होत आहे.
![Sai Tamhankar will be seen in an important role in Madhur Bhandarkar's India Lockdown](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-madhur-bhadarkar-saie-tamhankar-india-lockdown-mhc10001_22012021163844_2201f_1611313724_926.jpeg)
सत्य घटनांवर आधारित ‘इंडिया लॉकडाऊन’चे कथानक असून ते सर्व प्रवर्गातील समस्यांवर भाष्य करेल. झोपडपट्टीत राहणारे असो वा गगनचुंबी इमारतीत राहणारे असो, लॉकडाऊनने सर्वांनाच फटका दिला. मधुर भांडारकरांनी नेहमीच सामाजिक समस्यांवर बेतलेले चित्रपट दिले आहेत. ते कुठल्याही विषयाच्या अंतरंगात घुसून माणुसकीचे विविध पैलू सादर करतात. हेच या चित्रपटातून दिसेल असे म्हटले जात आहे.
हेही वाचा - बीसीसीआयने आणली नवीन फिटनेस 'टेस्ट'
महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. लॉकडाऊनआधी तिने लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘मिमी’चे शूट पूर्ण केले. या चित्रपटामध्ये सई क्रिती सनोनसोबत भूमिकेत दिसेल. तिचा ‘कलरफुल’ हा मराठी सिनेमादेखील प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. सई ताम्हणकरसोबत प्रतीक बब्बर, आहाना कुमरा आणि श्वेता बसू प्रसाद हे कलाकार आहेत. ‘इंडिया लॉकडाऊन‘चे शूटिंग पुढील आठवड्यापासून मुंबईत सुरू होणे अपेक्षित आहे.