लातूर - यंदा प्रथमच देशमुख कुटुंबातील दोघेजण विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरलेले आहेत. लातूर शहर विधानसभा मतदार संघात अमित देशमुख तर लातूर ग्रामीणमध्ये जि.प. सदस्य धीरज देशमुख निवडणूक लढवीत आहेत. या दोन्ही भावांच्या प्रचारासाठी लातुरात दाखल झालेला अभिनेता रितेश देशमुख सध्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. शिवाय संपूर्ण देशमुख कुटुंबीय सध्या प्रचारात दंग आहे.
लातूर शहर आणि ग्रामीण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या दोन्ही मतदार संघातील वर्चस्व कायम ठेवण्याच्या अनुषंगाने लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शुक्रवारी कुटुंबासमवेत या दोन्ही भावांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यावेळी सर्व कुटुंबीय उपस्थित होते. कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांना आकर्षण होते ते रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांचे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज धीरज देशमुख यांच्या प्रचारासाठी ते आज ग्रामीण भागात दाखल झाले होते. दोन्ही मतदार संघ काँग्रेसच्या आणि या देशमुख भावांच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. त्यामुळे अर्ज दाखल केल्यापासून माजी मंत्री दिलीपराव देशमुख, रितेश देशमुख, वैशालीताई देशमुख यादेखील प्रचारासाठी दाखल होत आहेत. ग्रामीण भागात साखर कारखाने, शिक्षण संस्था ह्या देशमुखांची जमेच्या बाजू आहेत. तर निवडणुकीच्या दरम्यान प्रचारासाठी दाखल झालेले रितेश आणि जेनेलिया हा देखील चर्चेचा विषय ठरत आहे.