मुंबई - अभिनेता रितेश देशमुखने नॉन-व्हेज जेवण, ब्लॅक कॉफी आणि एअरेटेड ड्रिंक्स (गॅस असलेले ड्रिंक) सोडले आहे. या वर्षाच्या सुरूवातीला रितेश आणि त्यांची पत्नी जेनेलिया यांनीही त्यांच्या अवयवांचे दान करण्याचा निर्णय जाहीर केला होता.
याबद्दल बोलताना रितेश म्हणाला, "मी नॉन व्हेज जेवण, ब्लॅक कॉफी आणि एअरेटेड ड्रिंक्स घेणे सोडून दिले आहे. मी माझ्या शरिराला आरोग्यदायी ठेवू इच्छितो. जेव्हा माझ्यावर अवयवांचे दान करण्याचा प्रसंग येईल तेव्हा लोकांनी म्हटले पाहिजे की, 'जाता जाता निरोगी अवयव सोडून गेला."
त्याने आणि त्याच्या पत्नीने अवयवदान करण्याचा निर्णय कसा घेतला हेदेखील रितेशने सांगितले.
'कौन बनेगा करोडपती'च्या करमवीर स्पेशल एपिसोडसाठी अभिनेता डॉ. सुनील श्रॉफ यांच्यासाठी खेळताना रितेश म्हणाला, ''आम्ही (जेनेलिया आणि रितेश) काही वर्षापासून अवयव दान करण्याबाबत विचार करीत होतो. या लॉकडाऊनमध्ये आम्हाला यावर अधिक विचार करायला वेळ मिळाला. दुर्दैवाने यासाठी कुठे गेले पाहिजे किंवा या बद्दलची प्रोसेस काय असते याबद्दल पुरेशी माहिती नव्हती. एके दिवशी दोघांनी एक व्हिडिओ बनवण्याचा निर्णय घेतला की, आम्हाला अवयव दान करायचे आहे.''