मुंबई - अभिनेता ऋषी कपूर गेली वर्षभर आजारपणात उपचार घेत होते. त्यामुळे त्यांना चित्रपटापासून दूर राहावे लागले होते. आता ते अमेरिकेत उपचार घेऊन भारतात परतले आहेत. त्यांच्यासोबत पत्नी नितू सिंगही त्यांच्या सेवेत होत्या. या दोघांनी घेऊन चित्रपट बनवण्याच्या विचारात बंगाली दिग्दर्शक शिबोप्रसाद मुखर्जी करीत आहेत.
दिग्दर्शक शिबोप्रसाद मुखर्जी हे बंगाली ‘पोस्टो’ या चित्रपटाचा रिमेक हिंदीत करणार आहेत. या चित्रपटाची कथा खूपच रंजक आहे. ही एका लहान मुलाची गोष्ट आहे. त्याचे आई वडिल परगावी नोकरी करीत असतात. त्यामुळे या बालकाला ते आजी आणि आजोबांकडे ठेवतात. अधून मधून ते मुलाच्या भेटीसाठी येत असतात. मुलाची आजी आजोबांसोबत गट्टी जमते. आई वडिलांहूनही त्याला प्रेमाची ऊब आजी आजोबांकडून मिळत असते. दरम्यान आई वडिलांची परदेशात बदली होते. ते मुलासह परदेशात जायाचे ठरवतात. मात्र त्याला आजी आजोबा विरोध करतात. मुलाची कस्टडी कोणाकडे असावी यासाठी हे प्रकरण न्यायालयात जाते. अशी वेगळी कथा ‘पोस्टो’ या सिनेमाची आहे.
यात आजी आणि आजोबांची भूमिका ऋषी कपूर आणि नितू सिंग साकारतील. यापूर्वी दोघांनी 'बेशर्म' या चित्रपटाच ७ वर्षापूर्वी एकत्र काम केले होते. यात त्यांचा मुलगा रणबीर कपूर याचीही भूमिका होती. दोघांचेही चाहते त्यांना पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.