मुंबई - अभिनेता रणवीर सिंगने बॉलिवूडला आत्तापर्यंत बरेच सुपरहिट चित्रपट दिले आहेत. पहिल्या चित्रपटापासूनच त्याने त्याची वेगळी ओळख बॉलिवूडमध्ये निर्माण केली आहे. आता त्याचा १९८३ साली झालेल्या 'वर्ल्ड कप'वर आधारित '८३' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. त्यासाठी तो कपिल देव यांच्यासोबत दिल्लीमध्ये १० दिवसांचे प्रशिक्षण घेणार आहे.
'८३' चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांना १९८३ च्या 'वर्ल्डकप'चा खेळ पाहता येणार आहे. या वर्ल्डकपमध्ये कपिल देव यांनी विशेष कामगीरी बजावली होती. त्यांची भूमिका साकारण्यासाठी रणवीर त्यांच्यासोबत वेळ घालवणार आहे.

रणवीरने आत्तापर्यंत ज्या भूमिका केल्या आहेत. त्यासाठी त्याने अथक परिश्रम घेतले आहेत. 'पद्मावत' चित्रपटात 'अलाउद्दीन खिलजी'च्या भूमिकेसाठी त्याने बराच काळ अंधाऱ्या खोलीत घालवला होता. 'गली बॉय' साकारण्यासाठी मुंबईच्या धारावीतल्या लोकांबरोबरही त्याने वेळ घालवून त्यांची परिस्थिती समजुन घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच या चित्रपटात तो एक रिअल गली बॉय वाटला.
आता तो कपिल देव यांची भूमिका देखील हुबेहुब साकारण्यासाठी त्यांच्यासोबत राहून प्रशिक्षण घेणार आहे. त्यांच्यासोबत राहून त्यांची जीवनशैली जवळून अनुभवण्यासाठी रणवीर उत्साहीत असल्याचे त्याने सांगितले आहे. त्यामुळे तो कपिल देव यांची भूमिका देखील सहज साकारेल यात शंका नाही.