मुंबई - सिनेसृष्टीत अभिनेते राज बब्बर यांची एक वेगळी ओळख आहे. तब्बल ३८ वर्षे त्यांनी बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले. ८० च्या दशकात राज बब्बर हे नाव आघाडीच्या अभिनेत्यांच्या यादीत होते. अभिनयासोबतच राजकारणातही त्यांनी आपल्या व्यक्तीमत्वाची छाप पाडली. त्यांच्या चित्रपटाच्या कारकिर्दीसोबतच त्यांची आणि स्मिता पाटील यांची प्रेमकथाही फार रंजक आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल या काही खास गोष्टी....
राज बब्बर यांचा जन्म २३ जून १९५२ रोजी झाला. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. १९७५ साली त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला होता. येथुनच त्यांनी अभिनयाचे धडे घेतले.
त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाले तर, त्यांनी 'आज की आवाज' या चित्रपटात स्मिता पाटील यांच्यासोबत भूमिका साकारली होती. या चित्रपटादरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मात्र, राज बब्बर आधीच विवाहीत असल्यामुळे स्मिता यांच्या आईने त्यांच्या लग्नाला नकार दिला होता. राज यांचे पहिले लग्न नादिरा बब्बर यांच्याशी झालेले होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी देखील होते. मात्र, ते स्मिता यांच्या प्रेमात एवढे आकंठ बुडाले होते, की त्यांनी त्यांच्या पहिल्या पत्नापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
पुढे त्यांनी स्मिता पाटील यांच्याशी १९८६ साली लग्नगाठ बांधली. त्यांना प्रतिक नावाचा मुलगा देखील आहे. प्रतिकच्या जन्मानंतर स्मिता यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राज बब्बर खूप ढासळले होते. त्यांच्या आठवणीत ते खूपदा भावुक व्हायचे.
त्यांचा मुलगा प्रतिक याने काही महिन्यांपूर्वीच लग्न केले आहे. त्याच्या लग्नात राज याचा उत्साह पाहायला मिळाला होता.