मुंबई - सनशाईन पिक्चर्सचे विपुल शहा यांनी प्रेक्षकांना अनेक मनोरंजक चित्रपट दिले आहेत. यावेळी झी स्टुडिओच्या सहकार्याने त्यांनी एक ॲक्शन आणि भावना यांचे मिश्रण असलेला चित्रपट आणलाय ज्यात विद्युत जामवाल पुन्हा एका ‘सणकी’ भूमिकेत दिसेल. चित्रपटाचे नाव आहे सनक, ज्याचे पोस्टर्स नुकतेच लाँच करण्यात आले आहे. विद्युत जामवाल यात मुख्य भूमिकेत असून त्याच्या कारकीर्दीत पाचव्यांदा विपुल शहाबरोबर काम करत आहे.
एका पोस्टरमधून काही खतरनाक बंदूकधारी गुंड विद्युतला घेरून आहेत व विद्युतची ॲक्शन-खासियत माहित असल्यामुळे त्यांची काही खैर नाही हे सांगणे न गरजेचे नाही. हे पोस्टर रिलीज झाल्याबरोबर अनेकांनी ते लाईक केले आहे. दुसऱ्या पोस्टरमध्ये एका रुग्णालयाच्या खाटावर सर्वत्र रक्ताचे डाग आहेत व उशीवर मशिनगन डोके ठेऊन निजली आहे. रहस्य वाढविणाऱ्या या पोस्टरवरून सिनेमातील ॲक्शनची कल्पना येते.
सनकलाही प्रेम मिळेल, अशी अपेक्षा
विद्युत जामवाल म्हणाला, प्रत्येक मनुष्यात सणकीपणा हा असतोच. विपुल शहा सोबत मी पाचव्यांदा काम करत आहे व त्याबद्दल उत्साहित आहे. सनकमधून एका सामान्य माणसाच्या भावनिक प्रवासाबद्दल भाष्य करण्यात आले आहे. माझ्या चाहत्यांनी याआधीच्या खुदा हाफिजला भरभरून प्रेम दिले तसेच प्रेम सनकलाही मिळेल अशी मी आशा करतो.
विपुल शहाने कमांडो 1-2-3, हॉलिडे, सिंग इज किंग, फोर्स 1 व 2 यासारखे बरेच चित्रपट निर्माण केले आहेत. जे आजही प्रेक्षकांच्या मनात ताजेतवाने आहेत. त्याने नेहमीच सर्व वयोगटातील प्रेक्षकांना भावतील असे चित्रपट बनविले आहेत. सनकही प्रेक्षकांचे मनोरंजन करेल असे त्यांचे मत आहे. विद्युत-विपुल ही जोडी नेहमीच हिट चित्रपट देत आली आहे व यावेळीही सनक त्याची पुनरावृत्ती करेल, अशी आशा विपुलने व्यक्त केली आहे.
सनकमध्ये विद्युत जामवाल सोबत चंदन रॉय सन्याल, नेहा धुपिया आणि बंगाली अभिनेत्री रुक्मिणी मैत्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत. झी स्टुडियोज प्रस्तुत, सनशाईन पिक्चर्स निर्मित सनकचे दिग्दर्शन कनिष्क वर्मा यांनी केले असून निर्माते विपुल अमृतलाल शहा आहेत.