पुणे - जागतिक मराठी अकादमीतर्फे मराठी भाषा दिवसानिमित्त प्रसिद्ध कवी आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याशी ‘पिस्तुल्या ते झुंडः एक प्रवास’ या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ वात्रटिकाकार आणि जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे आणि चित्रपट निर्माते-दिग्दर्शक विवेक वाघ यांनी मंजुळे यांच्याशी संवाद साधला.
यावेळी विविध प्रश्नांना उत्तरे देताना नागराज मंजुळे म्हणाले, ''मी ज्या करमाळा भागातून आलो, त्या भागात असताना अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, मिथुन हे सगळे हिरो म्हणजे आकर्षणाचे केंद्रबिंदू होते. आपणही त्यांच्यासारखेच राहावे, त्यांच्यासारखेच वावरावे असे त्यांचे चित्रपट पाहतांना नेहमी वाटायचे. मात्र चित्रपट पाहून रखरखत्या उन्हात बाहेर आल्यानंतर वास्तवाची प्रखर जाणीव व्हायची. त्यावेळी मला प्रश्न पडायचा की सगळेजण अशा चमचमत्या हिरोंच्या गोष्टी सांगणार असतील तर आपली गोष्ट कोण सांगणार आणि या अस्वस्थतेतून मी या क्षेत्राकडे वळलो. काल्पनिक चित्रपटांपेक्षा वास्तववादी चित्रपट अधिक जवळचे वाटले'', असे मत प्रसिद्ध कवी आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना नागराज यांनी सांगितले, 'पिस्तुल्या' या लघुपटापासून सुरू झालेला माझा प्रवास अभिनय क्षेत्राचे बादशहा अमिताभ बच्चन यांच्या बरोबरच्या 'झुंड' या चित्रपटात पर्यंत येऊन पोहोचला. अनोळखी चेहऱ्यांना संधी देऊन सुरू झालेला हा प्रवास अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत आला, याचा आनंद निश्चितच आहे. माझ्या चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी देखील मी नवीन चेहऱ्यांना संधी दिली. यामागे देखील वास्तववादी जीवनाचा आग्रह हे कारण आहे. 'सैराट' मधील लंगड्याची भूमिका एखादा प्रतिथयश कलाकार ज्या ताकदीने करेल, त्यापेक्षा वास्तव जीवनात अपंग असलेला मुलगा ती अधिक प्रखरतेने करू शकेल या जाणीवेतून मी कलाकारांची निवड केली. ज्या समाजाची कथा मी सांगतो आहे, त्याच समाजाची भाषा वापरणॆ, तिथल्याच लोकांना संधी देणे याकडे माझा कटाक्ष असतो. कारण त्या समाजाचे जगणेपडद्यावर प्रतिबिंबित झाले पाहिजे, याबाबतीत मी आग्रही असतो.
''कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता आपल्याकडे सांगण्यासारखे काही असेल तर आपण मोकळेपणाने सांगावे. त्यामध्ये भाषा, प्रांत, आपले राहणीमान या कोणत्याच गोष्टींचा न्यूनगंड न बाळगणे हे तत्व आधी जपले पाहिजे. कारण तुमच्या भावना ऐकायला जग तयार असते, हा माझा अनुभव आहे. तुमच्यात आणि समोरच्या व्यक्तीत सेतू बांधण्याचे काम भाषेच्या माध्यमातून होत असते. पण त्याचा गाभा मात्र भावनेचा असतो आणि आशय असलेल्या भावना पोहोचवणे गरजेचे असते. सैराटमुळे मला जे यश मिळाले त्यामुळे अनेक ठिकाणच्या कार्यक्रमांना जावे लागते. त्यावेळी मोडक्यातोडक्या इंग्रजीत माझ्या भावना व्यक्त करतो. पण मला हे जाणवते की, त्याठिकाणी असलेले लोक माझ्या भावना ऐकण्यासाठी खूप आसुसलेले असतात. कारण माझ्या बोलण्यातली तळमळ त्यांच्यापर्यंत पोहोचत असते. हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. तुम्ही इंग्रजीत बोलत असाल पण तुमच्या बोलण्यात भावनांना जागा नसेल तर ती भाषा केवळ वरवरची होते. त्यामुळे मराठी भाषेविषयी कोणताही न्यूनगंड न बाळगता तुम्ही आशयाच्या माध्यमातून तुमच्या घडणीवर भर दिला पाहिजे.''