मुंबई - मराठी सिनेमा हा कायमच एक प्रयोगशील सिनेमा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे प्रत्येक सिनेमासोबत वेगवेगळे प्रयोग इथे केले जातात. असाच एक प्रयोग या शुक्रवारी म्हणजेच १५ मार्चला रिलीज होणाऱ्या 'छत्रपती शासन' या सिनेमात केला गेला आहे. कारण या सिनेमात चक्क पुरुष कलाकारावर शूट केलेली लावणी आपल्याला पाहायला मिळणार आहे.
पुरुष कलावंतांनी सिनेमात स्त्री पात्र रंगवणे हे काही नवीन नाही. 'राजा हरिशचंद्र' या पहिल्या सिनेमातही स्त्रियांची पात्र पुरुष कलावंतांनी केली. एवढंच नाही तर मराठी रंगभूमीवरील नट बालगंधर्व हेही स्त्री भूमिका रंगवत असत. मात्र कालांतराने महिला सिनेमात काम करायला लागल्या आणि त्यामुळे ही गोष्ट मागे पडली. सिनेमात ग्लॅमर आणण्यासाठी त्यात हमखास लावणी दाखवली जाते. अशीच एक लावणी 'छत्रपती शासन' या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
कुशल मेहत्रे दिग्दर्शित 'छत्रपती शासन' या सिनेमातली ही लावणी किरण कोरे या पुरूष कलाकारावर चित्रित करण्यात आली आहे. राज गलफाडे यांनी हे गाणं कोरिओग्राफ केलं आहे. किरण हा गेली कित्येक वर्षे स्त्रीवेशात लावणी सादर करतो. या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच त्याला सिनेमात आपली कला दाखवण्याची संधी मिळाली आहे. 'छत्रपती शासन' या सिनेमात संतोष जुवेकर, मकरंद देशपांडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. शिवाजी महाराजांना देव मानणाऱ्या तरुण पिढीला त्यांची शिकवण प्रत्यक्ष आचरणात आणण्याचा संदेश या सिनेमाद्वारे देण्यात आला आहे.