मुंबई - दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा आगामी चित्रपट वरन भात लोन्चा कोन नाय कोन्चा हा मराठी चित्रपट वादात सापडला आहे. गिरणी कामगारांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटांमध्ये बोल्ड दृश्यामुळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटाचे नुकतेच ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. यात महिला आणि लहान मुलांना आक्षेपार्ह चित्रण दाखवण्यात आल्यामुळे याविरोधात मुंबई सत्र न्यायालयातील पोस्को न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिका आज सोमवार रोजी सुनावणी झाली. आता या याचिकेवर पुढील सुनावणी 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांच्यासह इतरांवर करण्यासंदर्भात मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांच्या मागणीनुसार या सर्वांवर आयपीसी कलम 156 (3) अंतर्गत गुन्हा दाखल करून चौकशीची मागणी भारतीय स्त्री शक्ती संघटनेतर्फे सीमा देशपांडे यांनी दाखल केली आहे. मुंबई पोलिसांनी कोणतीही दखल न घेतल्यानं तक्रारदारांची कोर्टात याचिका केली आहे.
महेश मांजरेकरांचा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात
वकील डी व्ही सरोज यांनी या तक्रारीत म्हटले आहे की वरन भात लोन्चा कोन नाय कोन्चा हा मराठी चित्रपट 14 जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात महिला आणि लहान मुलांना अतिशय आक्षेपार्ह पद्धतीने दाखवण्यात आले आहे. महेश मांजरेकर यांच्या विरोधात तक्रारकर्त्याने दावा केला आहे की चित्रपटातील आशयामुळे समाजात असंतोष निर्माण झाला होता, परिणामी संपूर्ण महाराष्ट्रात निदर्शने झाली. ट्रेलरमध्ये अनेक लैंगिक दृश्ये, हिंसक दृश्ये आहेत. तसेच या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अल्पवयीन मुलगा आणि महिलेची आक्षेपार्ह स्थितीतली दृश्यही दाखविली आहेत. यावर राष्ट्रीय महिला आयोगाने आक्षेप घेतला आहे. इतकेच नाही तर याविरोधात केंद्रीय माहिती प्रसारण खात्याकडे तक्रार केली आहे. हा ट्रेलर फेसबुक, यूट्यूब, ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर रेखा शर्मा यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला पत्र पाठवत ही सर्व दृश्ये सेन्सॉर करण्याची विनंती केली आहे. या सिनेमाचा ट्रेलर सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्यात आला आहे. या ट्रेलरमधून अल्पवयीन मुलांचा समावेश असलेल्या अशा लैंगिक सामग्रीच्या खुल्या प्रसारणाचा निषेध या पत्राद्वारे करण्यात आला आहे.
महिला आयोगाने पत्रात काय म्हटलंय?
वरण भात लोंचा, कोन नाय कोंचा या आगामी मराठी चित्रपट जो 14 जानेवारी 2022 रोजी प्रदर्शित झाला आहे त्यासंदर्भात भारतीय स्त्री शक्ती, महाराष्ट्राकडून राष्ट्रीय महिला आयोगाला तक्रार प्राप्त झाली आहे. 14 जानेवारीला प्रदर्शित चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अल्पवयीन मुलांवर आक्षेपार्ह पद्धतीने अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर फेसबुक, युट्युब, ट्विटर इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दर्शकांसाठी वयाचे कोणतेही बंधन न ठेवता प्रसारित केला गेला आहे आणि म्हणूनच अल्पवयीन मुलांसाठीही तो पाहण्यासाठी उपलब्ध आहे, जे निश्चित नियमापलीकडचं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अल्पवयीन मुलांसाठी अशी लैंगिक दृश्ये उपलब्ध आहेत, याचा महिला आयोग निषेध करतो. अध्यक्षा श्रीमती रेखा शर्मा यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांना या प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करण्यासाठी आणि चित्रपटाचा ट्रेलर आणि लैंगिक दृश्ये सेन्सॉर करण्यासाठी पत्र लिहिले आहे.
सोशल मिडीयावर लैंगिक दृष्ये प्रदर्शित न होण्याची खात्री
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लैंगिक दृश्ये उघडपणे प्रसारित होणार नाहीत याची खात्री करण्यास आयोगाने सांगितले आहे. या पत्राची प्रत सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनाही पाठवण्यात आली आहे. आयोगाला या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करण्याबाबत कळवावे, असंही पत्राच्या शेवटी महिला आयोगाने अधोरेखित केले आहे.
हेही वाचा - Naay Varanbhaat Loncha Kon Naay Koncha : महेश मांजरेकरांना महिला आयोगाची नोटीस; ट्रेलरही हटवले