पुणे - अभिनेत्री राणी मुखर्जीची मुख्य भूमिका असलेला 'मर्दानी २' हा चित्रपट १३ डिसेंबरला प्रदर्शित झाला आहे. महिलांवरील अत्याचाराचा बदला घेणाऱ्या धाडसी महिला पोलिसाची कथा यामध्ये दाखवण्यात आली आहे. या चित्रपटानंतर राणीच्या भूमिकेची प्रशंसाही केली जात आहे. अलिकडेच पिंपरी-चिंचवड शहरातील ३०० पेक्षा जास्त महिला पोलीस कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी 'मर्दानी २' चित्रपट पाहिला. या चित्रपटाचे आयोजन पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या मार्गदर्शखाली करण्यात आले होते.
महाराष्ट्रासह अवघ्या देशात पोलीस कर्मचारी अधिकारी हे दिवस रात्र कर्तव्य बजावत असतात. अशावेळी त्यांच्या व्यग्र आणि तणावपूर्ण जीवनात विरंगुळा असायला पाहिजे तसेच, त्यांचे मनोबल वाढावे, या उद्देशाने 'मर्दानी २' या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती पोलीस अधिकारी स्मिता पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा-पहिल्या आठवड्यात 'मर्दानी २'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी वाटचाल, जाणून घ्या कमाई
हा चित्रपट गुन्हेगारी आणि त्याच्या तपासावर आधारित असून यातून अनेक गोष्टी शिकण्यास मिळाल्याचे महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी सांगितले. स्मिता पाटील, डी.सी.पी, सायली चव्हाण पोलीस उपनिरीक्षक, मनीषा हाबळे, पोलीस उपनिरीक्षक यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. महिला पोलिसांना कर्तव्य बजावत असताना नेहमी मर्दानी रूप घ्यावं लागतं. त्यातच कामाचा ताण तणाव कमी व्हावा, यासाठी महिलाना 'मर्दानी २' चित्रपट दाखवला त्याबद्दल पोलीस आयुक्तांचे महिला कर्मचाऱ्यांनी आभार मानले आहेत. सोबतच मर्दानी चित्रपट बघून पुन्हा एक नवीन उत्साह निर्माण झाला, असेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-प्रदर्शनापूर्वी चुलबुल पांडे आणि खुषीची रोमॅन्टिक झलक, पाहा 'दबंग ३' चं 'आवारा' गाणं