अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. यातून पोस्टर वॉर सुरू झाले असून चित्रपट महामंडळाचा तमाशा आख्या कोल्हापूरला पाहायला मिळत आहे.
चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्यावर अभिनेत्री असलेल्या महिला संचालिकेने विनयभंगाचा आरोप केला होता. यातून त्यांची नुकतीच निर्दोष मुक्तता झाली. त्यानंतर त्यांनी या संचालकेसह इतर दोघांचा उल्लेख असलेले पोस्टर चित्रपट महामंडळाच्या दारात उभे केले. त्यामध्ये त्यांचे सभासदत्व रद्द करण्याची मागणी करत चित्रपट महामंडळाचाही निषेध केला.
याची माहिती मिळताच महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी हे पोस्टर फाडून टाकले, एवढ्यावरच न थांबता पेट्रोल ओतून ते जाळूनही टाकण्यात आले. या पोस्टरमुळे महामंडळातील अंतर्गत वादही आता चांगलाच पेटला आहे. त्यातून भविष्यकाळात मोठा संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.