ठाणे - आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे ठाण्यात चांगलेच वाहू लागले आहेत. सर्वत्र उमेदवार आणि कार्यकर्ते मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन हातखंडे अजमावत आहेत. ठाणे शहर मतदारसंघातून सेना भाजप युतीचे अधिकृत उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारासाठी चक्क खासदार तथा भोजपुरी सुपरस्टार मनोज तिवारी आल्याने उत्तर भारतीय मतदार हर्षभरित झाले होते.
ढोकाळी पासून काढलेल्या या प्रचारफेरीत मनोज तिवारी यांनी आपल्या हटके अंदाजमध्ये मतदारांना आकर्षित केले व संजय केळकर यांना मतदान करण्यासाठी आवाहन केले. प्रचारफेरी मनोरमानगर येथे येताच त्यांनी आपल्या शैलीत एक छोटेखानी भाषण देखील केल्याने आता उत्तर भारतीय जनता संजय केळकर यांच्या पारड्यातच आपले मत टाकतील, असा विश्वास केळकर यांनी व्यक्त केला. "मनोजवा आये तोहरे द्वारवा और फिर आयेगी महायुतीकी सरकारवा" हे भोजपुरी वाक्य उच्चरताच उपस्थितांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या रॅलीत खासदार राजन विचारे, महापौर मीनाक्षी शिंदे, नगरसेवक, नगरसेविका आणि महायुतीचे शेकडो कार्यकर्ते सामील झाले होते.