नवी दिल्ली - मल्याळम चित्रपट 'जल्लीकट्टू'ला २०२१च्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातून पाठवण्यात आले आहे. 'आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म' या प्रकारात भारताचा अधिकृत प्रवेश म्हणून जल्लीकट्टू चित्रपटाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने याबाबत घोषणा केली.
२७ भाषांतून निवडला गेला चित्रपट -
हा चित्रपट हिंदी, मराठी, ओडीया आणि इतर प्रादेशिक भाषांतील २७ चित्रटांतून निवडला गेला. या चित्रपटात डोंगराळ, दुर्गम भागातील एका खेडेगावातील कत्तलखान्यातून सुटलेला रेडा आणि त्याची शिकार करण्यासाठी पूर्ण गावातील एकत्र आलेले लोक अशी या चित्रपटाची कथा आहे.
हा चित्रपट 'माओइस्ट' या पुस्तकातील कथेवर आधारित आहे. लेखक हरिश यांनी हे पुस्तक लिहिले आहे. या चित्रपटात अँटोनी वर्गसे, चेंबन विनोद जोसे, साबुमोन अब्दुसमद आणि संथी बालाचंद्रन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
माणूस हा खरंतर प्राण्यांपेक्षाही क्रूर कसा आहे, हे या चित्रपटातून दिसून येतं, असे फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे ज्यूरी बोर्डचे अध्यक्ष राहुल रावैल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच पेलीस्सेरी हा सक्षम दिग्दर्शक असून त्यांने बनवलेला जल्लीकट्टू हा चित्रपट देशाला अभिमान वाटेल अशी उत्कृष्ट निर्मिती आहे, असेही ते म्हणाले. दिग्दर्शक पेलीस्सेरी हे 'अंगमाली डायरी' आणि 'ई मा याऊ' यांसारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखले जातात.
टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलमध्ये ६ सप्टेंबर २०१९ रोजी जल्लीकट्टूचा प्रिमिअर शो करण्यात आला होता. तसेच, गेल्या वर्षी ५०व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पेलिस्सेरीने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जिंकला होता.