भोपाळ - अभिनेत्री दीपिका पदुकोणचा 'छपाक' चित्रपट १० जानेवारीला देशभरात प्रदर्शित झाला आहे. अनेक वादविवादाच्या कचाट्यात अडकल्यानंतरही या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मध्यप्रदेश सरकारने हा चित्रपट टॅक्स फ्री दाखवण्याची घोषणाही केली होती. आता आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव (आयफा) पुरस्कार सोहळ्यात दीपिकाचा सन्मानही करण्यात येणार आहे. प्रदेश जनसंपर्क नेते पी. सी. शर्मा यांनी ही घोषणा केली आहे.
यंदाचा आयफा पुरस्कार मध्य प्रदेश येथील भोपाळ आणि इंदूरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. मार्च महिन्यात हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.
हेही वाचा -Public Review : पाहा, 'छपाक' पाहून काय म्हणत आहेत प्रेक्षक ...
या पुरस्कार सोहळ्याबद्दल पी. सी. शर्मा म्हणाले की 'या सोहळ्याचं बजेट ७०० कोटी इतके आहे. तब्बल ९० देशांमध्ये हा पुरस्कार सोहळा प्रसारित केला जाणार आहे. यामुळे राज्याच्या पर्यटनलाही वाव मिळेल'.
'छपाक' चित्रपटातून समाजात सकारात्मक संदेश मिळत आहे. त्यामुळे दीपिकाचा आयफा पुरस्कार सोहळ्यात गौरव करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा -'छपाक' आणि 'तान्हाजी'त एकच फाईट, 'एमपी'त वातावरण टाईट