मुंबई - 'फर्जंद' या सुपरहिट चित्रपटाचे निर्माते अनिरबान सरकार, स्वप्निल पोतदार, महेश जाउरकर आणि अभिनेता, दिग्दर्शक लोकेश गुप्ते 'ऋणानुबंध' च्या निमित्ताने एकत्र आले आहेत. लोकेश गुप्ते दिग्दर्शित 'ऋणानुबंध' या नव्या चित्रपटाचा मुहूर्त अलिकडेच पुणे येथे पार पडला. यावेळी सुनील आंबेकर (पूर्व राष्ट्रीय संघटनमंत्री, अ. भा. वि.प.) तसेच वैभव डांगे आणि चित्रपटातील कलाकार, तंत्रद्य मंडळींनी हजेरी लावली होती.
'एक सांगायचंय...' या चित्रपटाद्वारे लोकेश गुप्ते यांनी आपली दिग्दर्शकीय कारकीर्द सुरू केली होती. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांची दाद मिळाली होती. आजच्या तरुणांशी संबंधित गंभीर विषय लोकेशने या चित्रपटात हाताळला होता. आता 'ऋणानुबंध' ही एक वेगळी गोष्ट घेऊन लोकेश पुन्हा एकदा सज्ज आहे.
![Lokesh Gupte's upcoming Runanubandh film Muhurt completed](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-02-runanubandh-mahurat-7206109_21022020175827_2102f_1582288107_491.jpeg)
हेही वाचा -समीर आशा पाटील दिग्दर्शित 'डार्लिंग' या सिनेमाचं पहिलं पोस्टर लाँच
अभिनेता, दिग्दर्शक लोकेश आणि 'फर्जंद' चित्रपटाचे निर्माते या दोघांनीही आपापल्या पहिल्या चित्रपटातून ठसा उमटवणारी कामगिरी केली होती. या चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. 'ऋणानुबंध' या नव्या चित्रपटातून ते कोणता विषय आणि गोष्ट घेऊन येतात याची नक्कीच उत्सुकता आहे. येत्या दिवाळीत १३ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.