मुंबई - स्टार प्रवाह’ प्रेक्षकांसाठी नव्या वर्षात मनोरंजनाचा नवा ठेवा घेऊन आली आहे. मनोरंजनाचा हा प्रवाह आता दुपारच्या वेळेतही पाहायला मिळणार आहे. ३१ जानेवारीपासून दुपारी १ वाजता भेटीला येतेय नवी मालिका ‘लग्नाची बेडी’. अभिनेता संकेत पाठक दोन वर्षांनंतर या मालिकेच्या निमित्ताने टेलिव्हिजनवर पुनरामगन करतोय. ‘लग्नाची बेडी’ मालेकत संकेत आयपीएस ऑफिसर राघव रत्नपारखी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. देशावर मनापासून प्रेम करणारा आणि गुन्हेगारीचा खात्मा करण्यासाठी जीवाची बाजी लावायलाही मागेपुढे न पाहाणारा असा हा आयपीएस ऑफिसर राघव रत्नपारखी. संकेतसाठी ही मालिका नवं आव्हान असणार आहे.
अभिनेत्री सायली देवधर या मालिकेत सिंधू सावंत ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. या भूमिकेविषयी सांगताना सायली म्हणाली, “स्टार प्रवाह वाहिनीसोबत पुन्हा एकदा जोडली जातेय याचा आनंद आहे. याआधी स्टार प्रवाहच्या ‘लेक माझी लाडकी’ या मालिकेतून मी भेटीला आले होते. त्यामुळे ही मालिका करताना माहेरी आल्याचं फिलिंग आहे. सिंधू ही कोकणात वाढलेली मुलगी आहे. लहानश्या गावात लहानाची मोठी होऊनही तिची शिकण्याची इच्छा प्रबळ आहे. सिंधूचं आपल्या वडिलांवर खूप प्रेम आहे. त्यांची ती मनापासून सेवा करते. मात्र नियतीच्या मनात दुसरंच काहीतरी आहे.”
राघव रत्नपारखीची भूमिका अतिशय आव्हानात्मक
लग्नाची बेडी या मालिकेतल्या व्यक्तिरेखेविषयी सांगताना संकेत म्हणाला, “‘लग्नाची बेडी’ मधील राघव रत्नपारखी हा अतिशय प्रामाणिक आणि धाडसी आयपीएस ऑफिसर आहे. एकत्र कुटुंबात वाढलेला आणि नात्याचं महत्व जाणणारा. हे पात्र साकारण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. नव्या वर्षाची सुरुवात एका चांगल्या प्रोजेक्टने होतेय याचा आनंद आहे. खाकी वर्दीची ताकद आपल्या सर्वांनाच माहित आहे. ती परिधान केल्यानंतर अंगात एक वेगळीची ऊर्जा संचारते.”
हेही वाचा - 'पावनखिंड'मध्ये दिसणार रायाजी-कोयाजी बंधूंचा थरारक लढा