बंगरुळू - 'केजीएफ' या बहुभाषिक चित्रपटाचा कन्नड सुपरस्टार यश याचा ३४ वा वाढदिवस ८ जानेवारीला पार पडला. यासाठी फॅन्स यांनी मोठी तयारी केली होती. यशचे २१६ फूट उंच कटआऊट लावण्यात आले होते. तर ५००० किलोचा केक यावेळी कापण्यात आला. हा केक बनवायला २० लोकांना तब्बल ९६ तास लागले होते. हा केक ४० फूट रुंद आणि ७० फूट लांब इतका प्रचंड होता.
वर्ल्ड रेकॉर्डस ऑफ इंडियाच्या वतीने या विक्रमी केकची नोंद घेण्यात आली. तशा प्रकारचे सर्टिफिकेटही देण्यात आले आहे.
अभिनेता यश दोन वर्षानंतर आपला वाढदिवस साजरा करत होता. दोन वर्षापूर्वी त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच एका फॅनने आत्महत्या केली होती. २०१९ मध्ये तो 'केजीएफ' सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी होता. त्यामुळे यावर्षीचा वाढदिवस फॅन्सनी जोरदारपणे साजरा करण्याचे ठरवले होते. त्याच बरोबर यश याच्या 'केजीएफ' चित्रपटाला देशभर तुफान प्रतिसाद मिळाला. या सिनेमाने २५० कोटीचा व्यवसाय केला. इतकी कमाई करणारा केजीएफ हा पहिलाच कन्नड चित्रपट ठरला. त्यामुळे जोरदार सेलिब्रेशन चाहत्यांनी केले.