मुंबई - बॉलिवूडच्या आघाडीच्या दिग्दर्शकामध्ये करण जोहरचे नाव अग्रस्थानी आहे. त्याच्या दिग्दर्शनाखाली आजवर अनेक सुपरडुपरहिट चित्रपट तयार झाले. करण जोहरचे चित्रपट म्हणजे, रोमान्स, आधुनिकता, स्टाईल, फॅशन, विदेशातील लोकेशन्स आणि ग्लॅमर अशीच ओळख प्रेक्षकांमध्ये बनली आहे. मात्र, 'कलंक' चित्रपटाच्या निमित्ताने करणने भव्यदिव्य सेट आणि जुन्या काळ्यातील प्रेमकथा दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. तगडी स्टारकास्ट असूनही प्रेक्षकांना या चित्रपटाकडे पाठ फिरवली.
'कलंक' चित्रपटात आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर,सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त, माधुरी दिक्षीत, वरुण धवन या कलाकारांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपटाच्या पोस्टर पासून ते गाण्यांपर्यंत प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाच्या ट्रेलरनेही चाहत्यांची उत्सुकता वाढवली होती. मात्र, कमकुवत कथानकामुळे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून अपयशी ठरू लागला.
'कलंक'च्या अपयशाबद्दल करण जोहरने एका माध्यमाशी संवाद साधला. यावेळी बोलताना तो म्हणाला की 'कलंकच्या अपयशानंतर मी या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक वर्मनसोबत चित्रपटात नेमक्या काय चुका झाल्या याबाबत आम्ही बराच चर्चा केली. मी धर्मा प्रोडक्शनचा फक्त निर्माता नाही, तर कल्पक निर्माता आहे. जेव्हा 'कलंक' अपयशी ठरला. मी देखील अपयशी ठरलो. जर माझ्या निर्मितीखाली तयार झालेला एखादा चित्रपट अपयशी ठरत असेल, तर ती पुर्णत: माझी जबाबदारी आहे. मात्र, जर चित्रपट अपयशी झाला, तर तो का झाला, याचा शोध मी घेत असतो. यातून जे मला शिकायला मिळते, तेच माझ्यासाठी पुढील चित्रपटासाठी यश असते. मी 'कलंक'ला अपयशी समजत नाही. कारण, यातून मला पुढच्या यशासाठी वाट मोकळी झाली आहे'.