मुंबई - मराठी सिनेसृष्टीत आजवर अनेक वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट तयार झाले आहेत. आजकाल बायोपिकचाही सुकाळ सिनेसृष्टीत पाहायला मिळतोय. एखाद्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित चित्रपट बनवण्याकडेही दिग्दर्शकांचा कल वाढलेला दिसतोय. आता ज्येष्ठ लेखिका आणि माजी सनदी अधिकारी नीला सत्यनारायण यांच्या सत्य घटनेवर आधारित कादंबरीवर चित्रपट तयार करण्यात येत आहे. जजमेंट असे या चित्रपटाचे नाव आहे. ११ फेब्रुवारीला मुंबईत या चित्रपटाचा टीजर लॉन्च करण्यात आला आहे.
'जजमेंट' या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर सुर्वे हे करत आहेत. यामध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि मंगेश देसाई हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. घरगुती हिंसाचार या विषयावर आधारित हा चित्रपट आधारित आहे. तेजश्री या चित्रपटात एका महिला वकिलाची भूमिका साकारतेय, तर मंगेश हा तिच्या विक्षिप्त वडीलांच्या भूमिकेत आहे.
समीर सुर्वे यांनी यापूर्वी व. पु. काळे यांच्या 'श्री पार्टनर' या कादंबरीवर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यानंतर त्यांनी 'जजमेंट' या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा एका कादंबरीचं सिनेरूपांतर करून प्रेक्षकांसमोर आणायचे ठरवले आहे.
कथा कादंबऱ्यामधील विषय मोठ्या पडद्यावर मांडणे कायमच एक मोठे आव्हान असते. अशात कथेची पटकथेत बांधणी करताना अनेकदा त्याची तीव्रता कमी जास्त होण्याची शक्यता असते. अशात 'जजमेंट'द्वारे या टीमने ही तारेवरची कसरत कशी पार पडली असेल, याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. मात्र, त्यासाठी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट आपल्याला पहावी लागेल.