मुंबई - गायनक्षेत्रात आपल्या आवाजाने ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी लाखो करोडो चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. आता त्यांच्या कुटुंबातील आणखी एक सदस्य पार्श्वगायनात एन्ट्री करणार आहे. आशा भोसले यांची नात जनाई भोसले हिने आपल्या आजीच्या पावलावर पाऊल ठेवत पार्श्वगायनात पदार्पण केले आहे. विशेष म्हणजे आशा भोसले यांच्यासोबत तिने तिचे पहिलं वहिलं रेकॉर्डिंगही केलं आहे. स्वत: आशाताईंनीच या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे.
आशा भोसले आणि जनाई या दोघीही आध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांना मानतात. त्यामुळे जनाई आणि आशाताईंनी मिळून त्यांच्या स्तुतीपर गीतांच्या अल्बमला आपला आवाज दिला आहे. या गीतांचं लेखन राजीता कुलकर्णी यांनी केलं आहे
याबाबत बोलताना आशाताईंनी सांगितले, 'मी श्री श्री रवीशंकर यांना मानते. अनेकदा ते मुंबईत आल्यावर मी त्यांना भेटलेली आहे. इतर भक्तांप्रमाणेच ते माझ्याशी अंत्यंत आदराने आणि आपुलकीने वागतात. मात्र राजीता कुलकर्णी यांनी अतिशय साधी आणि सोपी गाणी लिहून ती माझ्याकडून आणि जनाईकडून गाऊन घेतलीत. फक्त प्रेम किंवा अध्यात्म एवढयापुरतंच सिमीत न राहता इतर प्रकारची गाणीही यात आहेत. ही गाणी अतिशय चांगली झाली असून ती श्रोत्यांना नक्की आवडतील', अशी खात्री असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
जनाई म्हणाली की, आजीसमोर गाण्याचं कायमच फार टेन्शन येणं सहाजिकच होतं. अनेकदा घरी मला आवडतं ते करून खाऊ घालणारी माझी आजी प्रत्यक्षातही तितकिच गोड आहे. तिच्यासोबत गायचं म्हंटल्यावर मला थोडं टेन्शन आलं होतं. मात्र, त्यानंतर आम्ही दोघींनीही ही गाणी गाऊन पूर्ण केली.
जनाई ही कथ्थक नृत्यात विषारद आहे. तिने शास्त्रीय संगीतही शिकलेलं आहे. गेल्या काही वर्षात अनेकदा आशाताईंसोबत परदेशात होणाऱ्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये ती त्यांच्यासोबत स्टेजवरही गाणी गायली आहे. मात्र, आता या गाण्यांच्या अल्बमच्या निमित्ताने पहिल्यांदाच आजी आणि नातीची ही जोडी एकत्र गाताना आपल्याला दिसणार आहे.