कोरोना काळात कोरोना योद्ध्यांमध्ये पोलिसांचे नाव खूप वर असेल. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी पार पाडली आणि अजूनही त्यासाठी ते झटताहेत. या कठीण वेळी अनेक सेलिब्रिटीज वेगवेगळ्या पद्धतीची मदत करून आपली सामाजिक बांधिलकी जपत आहेत. श्रीलंकेची ब्युटी क्वीन आणि बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिज भारतामध्ये राहते आणि तिनेदेखील भरपूर सामाजिक कार्य केले आहे. भारत देशाला व्हायरस विरूद्ध लढायला मदत करण्यासाठी ही विदेशी अभिनेत्री कसलीही कसर सोडत नाहीये.
![](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-jacqueline-fernandez-donates-raincoats-to-mumbai-police-mhc10001_25052021192926_2505f_1621951166_969.jpeg)
जॅकलिन ‘योलो’ या संस्थेद्वारे अनेक सामाजिक उपक्रमांत हिरीरीने भाग घेते. अलीकडेच तिने पुणे पोलिस फाउंडेशनला हातभार लावून पुणे पोलिसांना मदत केली. तसेच नुकतेच तिने अन्नदानासाठी मोठी मदत केली आणि स्वतः बाहेर येऊन तिने अन्नवाटप केले. आता जॅकलिनने मुंबई पोलिसांसाठी रेनकोट दिले असून त्यांचा येणाऱ्या आणि अवकाळी बरसणाऱ्या पावसाळ्यात उपयोग होईलच परंतु त्यांचा पीपीई किट सारखा देखील कोरोना विरुद्धची ढाल म्हणून उपयोग होईल. रेनकोट्ससोबत तिने इतर सुरक्षारक्षक वस्तूसुद्धा उपलब्ध करून दिल्या आहेत.
![](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-jacqueline-fernandez-donates-raincoats-to-mumbai-police-mhc10001_25052021192926_2505f_1621951166_507.jpeg)
मुंबई पोलिसांनी याची दाखल घेत सोशल मीडियावरून जाहीरपणे जॅकलिनचे आभार मानले आहेत. ‘जून जवळ येत असतानाच अख्खी मुंबई पावसाळ्याची तयारी करीत आहे. त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा तशाच तयारीला लागलो आहोत. थँक यू @Asli_jacqueline and #YoloFoundation या मदतीमुळे आमचे कर्मचारी या पावसाळ्यात आणि साथीच्या रोगात सुरक्षित राहण्यास मदत होईल. #StongerTogether
जॅकलिनचे मुंबई पोलिसांनी आभार मानल्यावर तिने सोशल मीडियावर लिहिले की, “ऊन, पाऊस, वारा असो किंवा वादळ, @MumbaiPolice नेहमीच रात्रंदिवस ड्युटी करीत असतात. त्यांना माझा सलाम. तुम्ही जे करताहात त्याबद्दल आम्हा सर्वांकडून तुम्हाला थँक यू 🙏🏻"
![](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-jacqueline-fernandez-donates-raincoats-to-mumbai-police-mhc10001_25052021192926_2505f_1621951166_631.jpeg)
जॅकलिन ने ‘यू ओन्ली लिव्ह वन्स’ (You Only Live Once) (योलो) (YOLO) नावाची संस्था स्थापन केली असून विविध एनजीओ संथांसोबत हातमिळवणी करीत ती कोरोना पीडितांची अनेक प्रकारे मदत करीत आहे. तसेच ‘फेलाईन फाउंडेशन’ (Feline Foundation) सोबत ती भटक्या प्राण्यांची काळजी घेत आहे. महत्वाचं म्हणजे गेल्यावर्षीपासूनच जॅकलिन लोकांना मदत करण्यासाठी धावपळ करीत आहे. यावर्षी देशातील कोरोना विषाणूच्या विनाशकारी दुसर्या लाटात गरजू लोकांना मदत करण्यासाठी ती रात्रीचा दिवस करताना दिसत आहे. ती तिच्या योलो फाउंडेशनसह गरजूंसाठी संसाधने मिळविण्यासाठी चोवीस तास कार्यरत आहे.
जॅकलिन फ़र्नांडीझ बॉलिवूडमधील अतिव्यस्त अभिनेत्रींपैकी एक असून ती वेळातवेळ काढून भारतासाठी भारतामध्ये सामाजिक कार्य करीत असते.
हेही वाचा - कांताबाई सातारकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सांस्कृतीक क्षेत्राचे मोठे नुकसान - बाळासाहेब थोरात