मुंबई - बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता इरफान खान गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरसारख्या आजाराशी झुंज देत होता. परदेशातून उपचारांनंतर तो भारतात परतला आणि लवकरच कामालाही सुरूवात करणार असल्याचे म्हटले जात आहे. नुकतेच एअरपोर्टवर दिसलेल्या इरफानने आपला चेहरा दाखवण्यास नकार दिला आहे.
इरफान खान विमानतळावर दिसताच माध्यामांचे आणि चाहत्यांचे कॅमेरे त्याची एक झलक कॅप्चर करण्याची वाट पाहत होते. मात्र, इरफानने आपला चेहरा दाखवण्यास नकार दिला. त्याच्या या विनंतीनंतर माध्यमांनेही त्याचा केवळ पाठमोरा फोटो घेतला.
इरफान खान लवकर पुन्हा कामाला सुरू करणार असल्यामुळे चाहते खूश आहेत. एका वृत्तानुसार, 'हिंदी मीडियम' चित्रपटाच्या सीक्वलमध्ये इरफान दिसणार आहे. हा प्रोजेक्ट त्याने साईनही केला असल्याचे समजतेय. यावरुन कळतेय की इरफानच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.
फेब्रुवारी २०१८ मध्ये 'हिंदी मीडियम'च्या सीक्वलची घोषणा झाली होती. होमी अदजानिया हे चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याचे जाहीर झाले होते. मात्र इरफानच्या आजारामुळे हा प्रोजेक्ट लांबणीवर टाकण्यात आला होता.