टेलिव्हिजन आणि चित्रपट या माध्यमातून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव आणि हरहुन्नरी अभिनेता अक्षय टंकसाळे यांनी ‘बस्ता’ चित्रपटातून एकत्र काम केले आहे. त्यांची केमिस्ट्री उत्तम जुळून आली असून त्यांच्या ‘बस्ता’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर २१ मार्चला झी टॉकीजवर होणार आहे. त्या निमित्ताने सायली आणि अक्षयसोबत संवाद साधला असता त्यांनी त्यांच्या चित्रपटाविषयीची मतं मोकळेपणाने व्यक्त केली.
चित्रपटाच्या निवडीबाबत सांगताना सायली म्हणाली, की लग्नसंस्थेवर आपण अनेकदा भाष्य करतो, पण एका शेतकऱ्याच्या मुलीचे लग्न यावर प्रकाश टाकणारी ही कथा आहे. मला या चित्रपटाचा विषय खूप आवडला आणि त्यातील माझ्या वाट्याला आलेली भूमिका मला खूपच भावली त्यामुळेच मी होकार कळविला होता. अक्षय म्हणाला, की मी नेहमीच वेगळ्या पद्धतीचे सिनेमे करण्यासाठी उत्सुक असतो. बस्ता चित्रपटाच्या कथेचा आशय खूप मोठा आहे. त्यामुळे मला साहजिकच ती खूप आव्हानात्मक वाटली. त्यातील मी साकारलेली भूमिका मी याआधी साकारलेल्या कुठल्याही भूमिकेपेक्षा खूप वेगळी आहे. पण नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे करायला मिळणार ही भावना माझ्यासाठी जास्त महत्त्वाची होती.
व्यक्तिरेखेबद्दल सांगताना अक्षय म्हणाला, की मी या चित्रपटात मनीष नावाच्या मुलाची भूमिका साकारली आहे, जो अत्यंत साधा, सरळ, गरीब मुलगा आहे आणि त्याच्या घरची परिस्थिती खूप बेताची आहे. आयुष्यात त्याला दोनच गोष्टी आवडतात. एक म्हणजे शेती करणे आणि दुसरी म्हणजे स्वत:वर प्रेम करणे. त्याला स्वातीसोबत लग्न करून संसार थाटायचा आहे, किंबहुना ते त्याचे आयुष्यातील एकाच लक्ष्य आहे. हल्लीच्या तरुणाईला शेतीत रस नाही. किंबहुना शिक्षणामुळे स्वतःची शेती करण्यापेक्षा ऑफिसातील खर्डेघाशी करण्यास प्राधान्य देतात. मी साकारत असलेली स्वातीसुद्धा त्याच विचारसरणीची आहे. मी या चित्रपटात स्वाती या एका शेतकऱ्याच्या मुलीची भूमिका साकारली आहे. तिने लहानपणापासून तिच्या वडिलांचा त्रास, त्यांचे कष्ट, त्यांची मेहनत बघितली आहे. त्यामुळे तिला शेतकऱ्याशी लग्न करायचे नाही आहे. तिला एका नोकरदार मुलाशी लग्न करायचे आहे. गावाकडची बऱ्यापैकी शिकलेली ही स्वाती भावनिक न होता खूप प्रॅक्टिकल विचार करणारी आहे, सायली भरभरून बोलली.
हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांच्या विविध प्रतिक्रिया आल्या. त्यावर सायली म्हणाली, ‘मनोरंजनासोबतच एक चांगला संदेश या चित्रपटाने दिला आहे. असा मला बऱ्याच लोकांकडून प्रतिसाद मिळाला. माझ्या भूमिकेसाठी प्रेक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या तसेच खूप कौतुकदेखील झाले.’ याबाबत बोलताना अक्षय म्हणाला, ‘मला शेतकरी मित्रांकडून खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. ते सर्व माझ्या भूमिकेसोबत रिलेट करू शकले, असेही त्यांनी मला सांगितले, ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. मी या आधी केलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळाली, असे सांगण्यात आले. तसंच अत्यंत ‘ठेहराव’ असलेली भूमिका त्यांना या चित्रपटात पाहायला मिळाली, असे म्हटले गेले.’
लग्नसंस्था, हुंडा, बडेजाव याबाबत दोघांनाही वाटते की तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. सायली आणि अक्षयने सर्वांना ‘बस्ता’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर २१ मार्चला झी टॉकीजवर पाहण्यासाठी आग्रहाचे ‘निमंत्रण’ दिले आहे.