मराठी सिनेसृष्टीला विनोदी सिनेमाची मोठी परंपरा आहे. पण सध्या दर्जेदार विनोदी सिनेमाची वानवा आहे. हीच कमतरता भरून काढण्याचं काम प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित 'चोरीचा मामला' या सिनेमाद्वारे करण्यात येणार आहे.
एकाच घरात पण वेगवेगळ्या परिस्थितीत अडकलेले काही जण जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय धमाल घडते 'चोरीचा मामला' या सिनेमातून आपल्याला पहायला मिळेल. जितेंद्र जोशी, अमृता खानविलकर, हेमंत ढोमे, अनिकेत विश्वासराव, कीर्ती पेंढारकर यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. ढोबळमानाने जरी मूळ कल्पनेत फारसं नाविन्य वाटत असल, तरीही या सिनेमाच्या मांडणीत प्रचंड प्रयोग केलेले आहेत. प्रेक्षकांनी टीजर पाहून पुढे नक्की काय घडतं याचे कितीही आखाडे बांधले तरीही ते ओळखता येण शक्य नसल्याच दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव यांच सांगणं आहे.
गेली काही वर्ष 'येरे येरे पैसा - 2', 'हिरकणी', 'मी पण सचिन' यासारख्या सिनेमात आणि 'शांतेच कारत चालू आहे' आणि 'तेरी भी चूप मेरी भी चूप' यासारख्या नाटकामध्ये व्यस्त असूनही प्रियदर्शन याने वेळात वेळ काढून 'चोरीचा मामला' हा सिनेमा लिहून पूर्ण केला आहे. सलग 33 रात्र या सिनेमाचं शूटिंग झालं असून त्यात सिनेमामधील कलावंतांनी भरपूर धमाल केली आहे.
मराठीतील सकस आणि दर्जेदार विनोदी कलाकारांनी काम केलेल्या सिनेमाच्या यादीत 'चोरीचा मामला' या सिनेमाचं नाव नक्की घेतलं जाईल. त्यांच्या सगळ्यांना हा सिनेमा म्हणजे एक अनोखी मानवंदना ठरेल असे मत प्रियदर्शन याने व्यक्त केलं आहे. येत्या 31 जानेवारी रोजी हा सिनेमा रिलीज होतोय. याच निमित्ताने प्रियदर्शन जाधवसोबत संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी विराज मुळे यांनी..