मुंबई - नुकताच ‘सरदार उधम’ हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आणि त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय. हा स्वातंत्र्यसैनिक सरदार उधम सिंगच्या जीवनावर आधारित असून प्रमुख भूमिकेत विकी कौशल आहे. आपल्या भूमिकेबद्दल सांगताना विकी म्हणाला की, ‘खरंतर हा चित्रपट प्रतिभाशाली, आतंरराष्ट्रीय ख्यातीचे अभिनेते इरफान खान करणार होते. परंतु त्यांच्या अकाली निधनानंतर तो माझ्याकडे आला. खरंतर, माझ्या आनंदाला पारावर नव्हता आणि इरफान सरांच्या एक टक्का जरी मी या भूमिकेला न्याय दिला असेल तर मी स्वतःला धन्य समजेन. ते एक महान कलाकार होते आणि त्यांनी वेगळ्या स्तरावर ही भूमिका नेऊन ठेवली असती याबद्दल दुमत नाही. परंतु मी दिग्दर्शक सुजित सरकारला पूर्णपणे शरण गेलो होतो आणि माझी अभिनय पाटी कोरी करून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती. मी त्यांना सांगितले, की माझा अभिनय-घडा रिकामा केलाय आता तुम्हाला हवा तसा तो भरा. अनेक वर्कशॉप्स आणि चर्चा केल्यानंतर मला वाटते की मी ही भूमिका दिग्दर्शकाला हवी तशी साकारू शकलोय आणि ती प्रेक्षकांनाही आवडेल.
कोरोना आघातामुळे अनेक चित्रपटांनी ओटीटीचा रस्ता पकडला त्यात ‘सरदार उधम’ सुद्धा आहे. चित्रपटगृहे कधी उघडणार याची कल्पना नसल्यामुळे अनेक निर्मात्यांनी हा निर्णय घेतला असेल परंतु दिग्दर्शक सुजित सरकार यांच्यामते ओटीटीमुळे हा चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता जास्त आहे. अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ हा खूप मोठा प्लॅटफॉर्म असल्यामुळे ‘सरदार उधम’ अनेकविध प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल अशी आशा निर्मात्यांनी बोलून दाखविली.
शूटिंग करताना भावनिक होण्याबद्दल सांगताना विकी कौशल म्हणाला, ‘मी अनेक प्रसंग चित्रित करताना आणि नंतरही भावनिक झालो होतो. खासकरून जालियनवाला बागचा प्रसंग करताना. तसेच दिग्दर्शक सुजित सरकार यांची खासियत आहे की ते पडद्यावर प्रसंग जिवंत करतात. त्यामुळे अनेकवेळा माझ्या डोळ्यात अश्रू तरळले. ‘मला शारीरिक तयारीबरोबरच मानसिक तयारी करायची होती. मला 20 वर्षीय उधम दर्शविण्यासाठी 15 किलो 2 महिन्यात कमी करायचे होते आणि नंतर 40 वर्षीय सरदार उधम सिंग साकारताना पुन्हा 20-25 दिवसांत 15-20 किलो वाढवावे लागले. तसेच जेव्हडे मटिरियल उपलब्ध होते ते वाढले आणि या चित्रपटाची टीम गेले ४ वर्षं यावर रिसर्च करत होते त्याचाही मला फायदा झाला. हे सर्व खूप कठीण होते. परंतु भूमिकेसाठी असलेलं झपाटलेपण हे सर्व करण्यास उद्युक्त करते’, विकी म्हणाला.
या चित्रपटातील भूमिका साकारल्यावर मी अधिक संयमी झालोय, असेही त्याने नमूद केले. शाळेत इतिहासाबद्दल फारशी रुची नसणाऱ्या विकीला भारताच्या स्वातंत्र्य लढ्याबद्दलच्या इतिहासात रुची होती. सरदार उधम सिंग यांनी ब्रिटिशांबद्दल असलेला राग 21 वर्षं जोपासला होता. स्वतःच्या रागाबद्दल सांगताना विकी म्हणाला, ‘मला राग आला की मी एकदम गप्प होतो. आता कोणत्या गोष्टीवर राग येतो. याबद्दल मी लिस्ट केलेली नाहीये, परंतु कधी कधी थकवा आल्यानंतर छोट्या छोट्या गोष्टी संतापजनक वाटू लागतात आणि हो भूक लागल्यावर वेळेवर जेवण मिळालं नाही तर माझी चिडचिड होते.
विकी कौशल आगामी सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिकमध्ये दिसेल. जो मेघना गुलझार दिग्दर्शित करीत आहे. तसेच यशराज फिल्म्स आणि धर्मा प्रॉडक्शन्सच्या दोन चित्रपटांत सुद्धा विकी कौशल दिसेल.