मुंबई - बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना नेहमीच त्याच्या हटके कथानकासाठी ओळखला जातो. सध्या त्याच्या आगामी 'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपटाची बरीच चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आयुष्मान समलैंगिक व्यक्तीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला सोशल मीडियावर दमदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे समलैंगिकतेसारख्या विषयाला स्वीकारण्यासाठी भारत सज्ज असल्याचे आयुष्मान खुरानाने म्हटले आहे.
अलीकडेच आयुष्मानने कोलकाता येथे साहित्यिक समारंभात सहभागी होण्यासाठी हजेरी लावली होती. यावेळी त्याने या चित्रपटाविषयी संवाद साधला.
'तीन वर्षांपूर्वी मी फिल्मफेअरला एक मुलाखत दिली होती. यावेळीच मी समलैंगिक प्रेमावर आधारित कथेच्या शोधात असल्याचे सांगितले होते. आता मला वाटते की भारतही या विषयासाठी तयार आहे. 'शुभ मंगल ज्यादा सावधान'च्या ट्रेलरवर मिळालेला प्रतिसाद हा अविश्वसनीय आहे. याचे पूर्ण श्रेय मी दिग्दर्शक हितेश कैवल्य यांना देतो', असे आयुष्मान यावेळी म्हणाला.
हेही वाचा -Public Review: कंगनाने घेतला 'पंगा', प्रेक्षकांची जिंकली मने
'शुभ मंगल ज्यादा सावधान' हा चित्रपट व्यावसायिक हिंदी चित्रपटाच्या श्रेणीमध्ये समलैंगिकता या विषयावर भाष्य करणारा म्हणून ओळखला जाईल. हा विषय लोकांपर्यंत पोहचवणे हाच या चित्रपटाचा उद्देश आहे, असेही तो म्हणाला.
आयुष्मानसोबत या चित्रपटात नीना गुप्ता, गजराज राव यांचीही पुन्हा एकदा भूमिका पाहायला मिळणार आहे. यापूर्वी तिघेही 'बधाई हो' चित्रपटात एकत्र झळकले होते.
हेही वाचा -Public Review : वरुण - श्रद्धाच्या डान्सची प्रेक्षकांवर छाप, पाहा प्रतिक्रिया
'शुभ मंगल ज्यादा सावधान' हा चित्रपट २१ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.