पणजी - येत्या २० ते २८ नोव्हेंबरपासून भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवासाठी आवश्यक असलेली कामे १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती गोवा मनोरंजन संस्थेचे (इएसजी) उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी दिली आहे.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 'इफ्फीचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे यासाठी आवश्यक निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासोबत गुरुवारी (१० ऑक्टोंबर) बैठक होती. यापुढील बैठक २० ऑक्टोबर रोजी होणार आहे. दरम्यान यावेळी कामाचा संपूर्ण अहवाल सादर केला जाणार आहे.
गोव्यातील एकही चित्रपट 'इंडियन पँनोरमात समाविष्ट न केल्यामुळे गोव्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी संताप व्यक्त केला होता. तसंच मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालण्याची मागणी केली होती. यावर बोलताना फळदेसाई म्हणाले, ही बाब केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यावर त्यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु, इफ्फीतील चित्रपट निवडीमध्ये इएसजी अथवा केंद्रीय फिल्म विभाग यांचा काहीही हस्तक्षेप करत नाही. तसेच 'इफ्फी' गोव्यात सुरू झाल्यानंतर एकही गोमंतकीय चित्रपटाची निवड करण्यात आलेली नाही.
हेही वाचा -IFFI 2019: गोव्यात रंगणार आंतरराष्ट्रीय चित्रपट सोहळ्याचा सुवर्णमहोत्सव
गोव्यात चित्रपट महोत्सवात गोवा सरकार मोठा खर्च करत असल्याचे बोलले जाते. परंतु, सरकार कमीतकमी खर्च करण्याचा प्रयत्न करत असते, असे सांगून फळदेसाई म्हणाले, मागील काही वर्षांत कमी खर्च केला आहे. २०१६ मध्ये २२ कोटी ६२ लाख रुपये, २०१७ मध्ये १७ कोटी ८ लाख रुपये तर, २०१८ मध्ये १२ कोटी ९४ लाख रुपये खर्च करण्यात आला. यंदाचा हा खर्च प्रायोजकांच्या माध्यमातून उभारला जाणार आहे. यासाठी एका एजन्सीची नियुक्ती करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मंजुरी मिळताच नियुक्ती केली जाईल.
यावेळी इफ्फीचे सचिव सतीजा, इएसजीच्या व्यवस्थापक मृणाल वाळके उपस्थित होते.
हेही वाचा -इंडियन पॅनोरमात गोमंतकीय चित्रपटाचा समावेश नसल्याने दिगंबर कामत यांनी व्यक्त केला संताप