मुंबई - कपूर खानदानात यावेळी गणपती बाप्पा मोरयाची घोषणा दुमदुमणार नाही. दरवर्षी कपूर कुटुंबीय गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करीत होते. परंतु यंदा त्याला ब्रेक लागणार आहे. आर के स्टुडिओमध्ये कपूर कुटुंबीय गेली ७० वर्षापासून गणेशोत्सव साजरा करतात. मात्र हा स्टुडिओच विकावा लागल्यामुळे हा पारंपरिक उत्सव थांबवावा लागत आहे.
राज कपूर यांनी आरके स्टुडिओत गणेशोत्सव सुरू केला. स्टुडिओच्या परिसरात मोठा मंडप टाकला जायचा. विधीवत पूजा अर्चा व्हायची. शशी कपूर, राजीव कपूर, ऋषी कपूर यांच्यासह आजच्या पिढीतील रणबीर, करिना, करिश्मा कपूर या उत्सवात सहभागी व्हायचे. या उत्सवाला असंख्य सेलेब्रिटी भेट द्यायचे. आरके स्टुडिओचा जसा गणेशोत्सव जोरदार साजरा व्हायचा तसाच होळीचा उत्सवही साजरा व्हायचा. यंदा मात्र स्टुडिओत रंग उधळला गेला नाही. आता गणेशोत्सवावरही हीच वेळ आली आहे.
आरके स्टुडिओला आग लागल्यानंतर इथले वैभव लोप पावत गेले. शेकडो हिंदी चित्रपटांचे शूटींग झालेल्या या स्टुडिओतून लाईट कॅमेरा अॅक्शनचा आवाज येईनासा झाला. कपूर कुटुंबियांकडे स्टुडिओ पुन्हा उभारण्याची क्षमता राहिली नाही. अखेर हा स्टुडिओ विकावा लागला. त्यामुळे गेल्या वर्षी या ठिकाणी शेवटचा उत्सव पार पडला. आता ही ७० वर्षाची परंपरा खंडीत झाली आहे.