पुणे - मराठी सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. देशात मंदीचे वातावरण असून हे संकट दूर व्हावं, असे साकडं गणपती चरणी सोनालीने घातलं. तसेच पूर परिस्थिती निर्माण झालेल्या नागरिकांच्या घरी सुख समृद्धी लाभो, असे ही सोनाली म्हणाली.
दरवर्षी सोनाली इकोफ्रेंडली गणेशाची प्राणप्रतिष्ठा करते. गेल्या दोन वर्षांपासून सोनाली आणि तिचा भाऊ स्वतःच्या हाताने गणपतीची मूर्ती साकारतात. यावर्षीही तब्बल सहा ते सात तास मेहनत करून तिनं बाल गणेशाची मूर्ती साकारली आहे. सुबक अशी ही मूर्ती असून बाल गणेशाच्या हातात वीणा आहे. मोठ्या भक्तिमय वातावरणात सोनालीने गणपती बाप्पाचे स्वागत केले.
यावर्षी देशासह महाराष्ट्रात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, मात्र ही आपल्याच चुकांमुळे ओढवली असल्याचे तिने सांगितले. आत्तापर्यंत काय झालं, यापेक्षा काय करता येईल, याचा विचार करण्याची गरज आहे. ही सुरुवात स्वतः पासून करणे गरजेचे आहे. तसेच नदीमध्ये निर्माल्य विसर्जित करताना विचार करा, असे ही ती म्हणाली.