मुंबई - पुलवामा इथं सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बॉलिवूड मधून त्याची प्रतिक्रिया उमटली होती तर अनेक कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा आधार घेऊन आपला राग व्यक्त केला होता. मात्र आता सिनेसृष्टीतील तंत्रज्ञ आणि कामगारांना हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करायची संधी मिळावी यासाठी दोन तास शुटींग बंद ठेऊन ब्लॅक डे पाळण्याचा निर्णय फेडरेशन ऑफ ऑल इंडिया सिने इम्पोईज असोसिएशन ने घेतलाय.
या बंदमध्ये निर्माते आणि कलाकारांनी सामील व्हावे अस आवाहन करण्यात आलंय. शुटींगसोबत मालिकाच पोस्ट प्रोडक्शनच कामही यावेळी बंद ठेवावं असं सांगण्यात आलंय. फेडरेशनचे अध्यक्ष बी एन तिवारी, जनरल सेक्रेटरी अशोक दुबे आणि फिल्म सेटिंग एलाईड मजदूर युनियनचे गंगेश्वरलाल श्रीवास्तव यांनी संयुक्तरित्या पत्रक काढून हा ब्लॅक डे पाळण्यात येणार असल्याचे जाहीर केलंय.
हा दिवस रविवार असला तरीही मुंबईत अनेक टीव्ही मालिका आणि सिनेमाची शुटींग अहोरात्र सुरूच असतात. त्यामुळे दुपारी 12 ते 2 असे दोन तास शुटींग बंद ठेऊन हाताला काळ्या फिती बांधून गोरेगाव चित्रनगरीच्या गेटवर जमून या शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात येईल. हिंदी मालिकाप्रमाणेच मराठी मालिकांचाही यात समावेश असेल.
फक्त चित्रनगरीच नाही तर मुंबईच्या आसपासच्या परिसरात होणाऱ्या मालिकांच्या चित्रीकरण स्थळीही शूटिंग बंद ठेवण्याच आवाहन फेडरेशनच्या वतीने करण्यात आलंय. यातून तुम्ही एकटे नसून पूर्ण देश तुमच्या दुःखात सहभागी असल्याचा संदेश याद्वारे देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.