मुंबई - गेल्या काही दशकांपासून भारतीय संस्कृतीत सुद्धा लव्ह मॅरेजचे प्रमाण वाढलंय. त्याआधी लग्नें ठरवून म्हणजेच अरेंजड मॅरेज असायची. बऱ्याच वेळेला लग्न होईपर्यंत नवऱ्या मुलाने होणाऱ्या बायकोचे मुखकमलही पाहिलेले नसायचे. लव्ह मॅरेज असो की अरेंजड मॅरेज असो प्रत्येकाचे फायदे आणि त्रुटी आहेतच. अरेंजड मॅरेजचे फायदे अधोरेखित करणारा एक मराठी सिनेमा येऊ घातलाय, ‘तुझं माझं अरेंज मॅरेज’. अतिशय धमाल आणि मनोरंजक पद्धतीने अरेंजड मॅरेज हा विषय या चित्रपटात हाताळण्यात आला आहे. पहिल्यांदाच अरेंजड मॅरेज या विषयावर नवा कोरा चित्रपट येत आहे.
'तुझं माझं अरेंज मॅरेज' टीम प्रीतम कागणे आणि बिपिन सुर्वे ही फ्रेश जोडी 'तुझं माझं अरेंज मॅरेज' या चित्रपटातुन प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला येत आहे. प्रीतम आणि बिपिनची जोडी एका वेगळ्या धाटणीच्या गंभीर विषयाच्या गमतीदार कथेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. 'हलाल', 'नवरा माझा भोवरा', 'वाजवूया बँड बाजा', 'अहिल्या', 'विजेता' या चित्रपटातून अभिनेत्री प्रीतम कागणे प्रेक्षकांसमोर आली. तर अभिनेता बिपिन सुर्वे 'प्रतिभा' या चित्रपटातून आणि 'चंद्र आहे साक्षीला' या मालिकेतून सिनेरसिकांच्या भेटीस आला. या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदाच मोठया पडद्यावर दिसणार आहे. 'तुझं माझं अरेंज मॅरेज' चित्रपटात नवरा - बायको अशी भूमिका साकारताना प्रीतम आणि बिपिन दिसणार आहेत. प्रीतम या चित्रपटात मीरा नावाच्या नवरी मुलीची तर बिपिन स्वरूप नावाच्या नवऱ्या मुलाची भूमिका साकारत आहे. या दोघांच्यात ‘तिसरं’ कुणी आल्यावर आणि का आपल्यावर ज्या गोष्टी घडतात त्या मार्मिक पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत.
'तुझं माझं अरेंज मॅरेज' पोस्टर 'षष्ठीज फिल्म्स अँड एंटरटेन्मेंट'चे निर्माते अमित तिळवणकर आणि निर्माती ज्योती अमित तिळवणकर यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली असून या चित्रपटाद्वारे दिनेश शिरोडे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. अभिनेत्री प्रीतम कागणे आणि अभिनेता बिपिन सुर्वे व्यतिरिक्त या चित्रपटात अमोल कागणे, सयाजी शिंदे, अभिजित चव्हाण, मीरा सारंग, अभिलेशा पाटील, भाग्यश्री नलवे आदी कलाकारांच्या दमदार भूमिका पाहायला मिळणार आहेत. धमाल, मस्ती करण्यासाठी ‘तुझं माझं अरेंज मॅरेज' हा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीस दिवाळीच्या सुमारास येईल असे दिग्दर्शकाने सांगितले आहे. हेही वाचा -
'द व्हाईट टायगर'मधील भूमिकेसाठी आदर्श गौरवला 'बाफ्टा'साठी नामांकन