मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मनोरंजनसृष्टीचे रुळावर येत चाललेले वेळापत्रक पुन्हा एकदा कोलमडले आहे. तरीही अनेक निर्माते आपल्या चित्रपटांचे चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर करण्यावर भर देत आहेत. ‘टकटक २’ या चित्रपटाने देखील आपल्या पहिल्या शेड्युलसाठी गोवा गाठले. दोन वर्षांपूर्वा जेव्हा ‘टकाटक’ प्रदर्शित झाला, तेव्हा मराठी सिनेसृष्टीला बॉक्स ऑफिसवर हिट ठरणाऱ्या एका चित्रपटाची नितांत गरज होती. ‘टकाटक’नं ती पूर्ण केली. आता कोरोनामुळं संपूर्ण सिनेसृष्टीमध्ये मरगळ आलेली असताना ‘टकाटक २’च्या टीमनं उत्साहवर्धक पाऊल उचलत गोव्यामध्ये शूटिंगचं पहिलं शेड्युल यशस्वीपणे पूर्ण केले आहे.
कोरोनाच्या भयग्रस्त वातावरणातही काही सकारात्मक पावले सिनेसृष्टीमध्ये नवचैतन्य निर्माण करणारी ठरत आहेत. ‘टकाटक २’ या आगामी मराठी चित्रपटानंही सकारात्मक पाऊल टाकत मराठी सिनेसृष्टीत उत्साह निर्माण करण्याचं काम केलं आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे गोव्यामध्ये रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. गोव्यात २१ एप्रिल ते ३० एप्रिल २०२१ पर्यंत नाईट कर्फ्यू सुरू राहणार आहे. आता गोव्यातही कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यातच तिथले शूटिंग पूर्ण झाल्याने ‘टकाटक २’ची टीम एकप्रकारे सुदैवी ठरली आहे.
‘टकाटक २’च्या माध्यमातून पुन्हा एकदा दिग्दर्शक मिलिंद कवडे प्रेक्षकांसाठी काहीतरी नावीन्यपूर्ण घेऊन येत आहेत. पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातील कथानकही तरूणाईवर आधारित आहे. असं असलं तरीही तरूणाईपासून थोरांपर्यंत सर्वजण ‘टकाटक २’च्या कथानकाशी एकरूप होतील. महाराष्ट्रात शूटिंगला बंदी आहे, पण गोव्यामध्ये ‘टकाटक २’चं चित्रीकरण करताना संपर्ण टीमनं योग्य ते सहकार्य केलं. कोणतीही अडचण न येता पहिलं शेड्यूल पूर्ण करू शकल्याचं समाधान मिलिंद कवडे यांनी व्यक्त केलं आहे.
पर्पल बुल एंटरटेनमेंट प्रा. लि.च्या बॅनरखाली ‘टकाटक २’ची घोषणा करण्यात आल्यानंतर लगेचच गोव्यामध्ये मुहूर्त करून चित्रीकरणाचा श्रीगणेशा करण्यात आला होता. ओमप्रकाश भट्ट आणि धनजंय सिंग मासूम यांची निर्मिती तसेच जगत सिंग यांची सहनिर्मिती असलेल्या ‘टकाटक २’च्या टीमच्या सर्वच कलाकारांनी उत्तम अभिनय करत अगदी ठरलेल्या वेळेत शेड्युल पूर्ण केलं आहे. गोव्यातील निसर्गरम्य वातावरणाशी एकरूप होत कलाकारांनी भन्नाट अभिनय करत एक वेगळंच रसायन सादर केलं आहे, ज्याचा अनुभव प्रेक्षकांना सिनेमा पाहताना नक्कीच येईल. सर्व तंत्रज्ञांचीही सुरेख साथ लाभल्याचं यावेळी मिलिंद कवडे म्हणाले.
‘टकाटक २’ ची कथा आणि पटकथालेखन मिलिंद कवडे यांनी केलं असून संवादलेखन किरण बेरड यांनी केलं आहे. हजरत शेख वली या चित्रपटाचे डीओपी आहेत. नीलेश गुंडाळे यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे. गीतलेखन जय अत्रे यांनी केलं असून वरूण लिखते यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. गोव्यातील शूटिंग शेड्युल यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर ‘टकाटक २’ची टीम मुंबईत परतली आहे.
‘टकाटक’मध्ये दिसलेला प्रथमेश परब पुन्हा एकदा या सिक्वेलमध्ये मुख्य भूमिका साकारत रसिकांचं मनोरंजन करणार आहे. अक्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, भारत गणेशपुरे, आशा शेलार, किरण माने, पंकज विष्णू, निशा परूळेकर, राहुल बेलापूरकर, किरण बेरड, आरजे महेश काळे, अभय कुलकर्णा आणि इतर कलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका यात आहेत.
सध्या लॉकडाऊनचं वातावरण आहे. त्यामुळे लॉकडाऊननंतर ‘टकाटक २’च्या पुढील शेड्युलची आखणी करण्यात येणार असल्याचे समजते आहे.