मुंबई - धूम चित्रपटांच्या मालिकेतील आता धूम-4 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात एक अभिनेत्री मुख्य खलनायिका असणार आहे. त्यासाठी दीपिका पादुकोणचे नाव जवळजवळ निश्चित झाले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दीपिकादेखील पहिल्यांदाच 'ग्रे शेड'ची भूमिका साकारणार आहे. धूम 4 मध्ये अभिषेक बच्चन आणि उदय चोप्राच्या भूमिकाही निश्चित मानल्या जात आहेत.
पहिल्या धूमपासून या चित्रपटांची मालिका भारतामध्ये सुपरहिट ठरली आहे. जॉन अब्राहम, हृतिक रोषन आणि आमिर खान यांनी साकारलेल्या खलनायकांच्या भूमिका हिरोपेक्षा जास्त भाव खाणाऱ्या होत्या. त्यामुळे दीपिकाला खलनायकाची भूमिका दिली तर तिच्या कामगिरीकडे अनेकांचे लक्ष असेल.
धूम 4 ची जादू कितपत चालणार
धूम 4 मध्ये रणवीर सिंह आणि शाहरुखला मागे टाकत दीपिकाने बाजी मारली आहे. म्हणजे दीपिका लवकरच आपल्याला स्टायलिश चोराच्या भूमिकेत दिसणार आहे. दीपिकासाठी ही भूमिका कारकिर्दीतील 'गेंम चेंजर' ठरेल, अशी शक्यता निर्माते व्यक्त करत आहेत. याआधी ऐश्वर्या राय बच्चननेही धूम चित्रपटात खलनायिकेची भूमिका साकारली होती. धूमचे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले होते. आता धूम 4 ची जादू कितपत चालणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. लवकरच या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल.