मुंबई - रंगाचा सण होळी बॉलिवूडमध्ये खूप रंगारंग पद्धतीने साजरा केला जातो. मात्र, दीपिका पदुकोणला या खेळात इंटरेस्ट नाही. याचे कारण सांगताना तिने एक किस्सा सांगितला.
दीपिकाचा तो सुरुवातीचा काळ होता. तेव्हा ती आपल्या मॉडेलिंगच्या कामाला सुरुवात करीत होती. यासाठी ती आईसह मुंबईत पोहोचली होती. पेडर रोडवर तिचे आजोबा राहत असत. त्यांच्या घरी जाण्यासाठी दोघींनी टॅक्सी केली. तो दिवस होळीचा होता. रस्त्यावर तरुणांची टोळकी रंग उधळत होती.
रस्त्यावरची गर्दी लक्षात घेऊन त्यांनी टॅक्सीतून उतरत घरी चालत जाण्याचा निर्णय घेताल. फुटपाथवरून दीपिका आईसह चालली होती. एवढ्यात तिच्या आईच्या दिशेने अंडे फेकले गेले. खरेतर ते अंडे दीपिकाच्या दिशेने भिरकावले होते. परंतु, ते तिच्या आईला लागले. त्यानंतर अंड्यांचा वर्षाव सुरूच राहिला.
त्यादिवशी दीपिकाकडे बदलण्यासाठी कपडेही नव्हते. हा होळीचा अनुभव तिच्यासाठी वेदनादायी होता. जेव्हाही होळीची आठवण येते तेव्हा हा किस्सा तिच्या डोळ्यासमोर उभा राहतो. त्यामुळे होळी खेळण्यामध्ये तिला फारशी रुची नाही.