मुंबई - मराठी चित्रपट क्षेत्रातील आघाडीची अभिनेत्री दीपाली भोसले- सय्यद हिला महामंडळाची लॉटरी लागलीये. नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यातील विविध महामंडळावरील नियुक्त्यामध्ये औरंगाबाद विभागातून राज्य चित्रपट आणि रंगभूमी सांस्कृतिक महामंडळावर नियुक्त करण्यात आलं आहे.
या महामंडळावर तिच्याशिवाय ख्यातनाम उद्योजक आणि निर्माते संग्राम शिर्के, दिग्दर्शक सतीश राजवाडे, अभिनेत्री आणि लेखिका शिल्पा नवलकर आणि विलेपार्ले मधील शिवसेनेचे नगरसेवक शशिकांत पाटकर यांची संचालकपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
मात्र महामंडळातील एक नियुक्ती विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाच्या वाट्याची होती. त्यामुळे शिवसंग्राम पक्षाकडून दीपाली हिला ही संधी देण्यात आली आहे. ही नियुक्ती पुढील तीन वर्षासाठी असेल. मराठी चित्रपट आणि रंगभूमी साठी भरीव योगदान देण्याची संधी याद्वारे दीपाली ला मिळालेली आहे. आज शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्याहस्ते दिपलीला हे नियुक्तीपत्र देण्यात आलं.
दीपालीने यापूर्वी आम आदमी पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र नंतर तिने या पक्षाची कास सोडत मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाचं सदस्यपद स्वीकारलं होतं. त्याचंच बक्षीस तिला या नियुक्तिद्वारे मिळालं आहे.